शहरातील १२२ बड्या हॉटेलांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:53 AM2021-01-13T04:53:20+5:302021-01-13T04:53:20+5:30

अहमदनगर : स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून ओला व सुका कचरा वेगळा न करणाऱ्या शहरातील बड्या हॉटेलचालकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या ...

Notice to 122 big hotels in the city | शहरातील १२२ बड्या हॉटेलांना नोटिसा

शहरातील १२२ बड्या हॉटेलांना नोटिसा

अहमदनगर : स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून ओला व सुका कचरा वेगळा न करणाऱ्या शहरातील बड्या हॉटेलचालकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. हॉटेलमधील कचरा ओला व सुका वेगळा करून महापालिकेच्या घंटागाडीत न टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

महापालिकेने स्वच्छ भारत अभियान २०२१ मध्ये सहभाग घेतला आहे. मागील वर्षी अहमदनगर शहराचा स्वच्छतेत देशात ४० वा क्रमांक आलेला आहे. त्यामुळे महापालिका फाईव्ह स्टार मानांकनाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरली असून, हे मानांकन मिळावे, यासाठी आरोग्य विभागाची धडपड सुरू आहे. त्यामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी ६०० गुण आहेत. मात्र, शहरातील हॉटेल चालकांसह इतर व्यावसायिक कचरा ओला व सुका, असा वेगळा न करता एकत्रितच घंटागाडीत टाकतात. आरोग्य विभागाने वेळोवेळी सूचना देऊन हॉटेलचालकांनी ओला व सुका कचरा वेगळा केला नाही. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ओला व सुका कचरा वेगळा न करणाऱ्या शहरातील १२२ हॉटेलचालकांना नोटिसा बजावलेल्या आहेत. हॉटेलमधील ओला व सुका, कचरा वेगळा करावा, अन्यथा कचरा स्वीकारला नाही तसेच नियमांनुसार कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास दोन हजारांपर्यंत दंड करण्यात येईल, असे नोटिसीद्वारे हॉटेलचालकांना कळविण्यात आले आहे.

.....

स्मरणपत्रानंतर कर्मचारी लागले कामाला

महापालिकेतील इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांची प्रभाग निहाय पथके स्थापन करण्यात आलेले आहेत. तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सर्व प्रभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी ७ ते ९ या वेळेत शहरात फिरून ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत जनजागृती करावी, असा आदेश जारी केला होता. दरम्यान मायकलवार सेवानिवृत्त झाले. त्यामुळे हा आदेश इतर विभागांनी गांभीर्याने घेतला नव्हता. त्यामुळे सर्व विभागांना याबाबत स्मरणपत्र देण्यात आले आहे. हे पत्र हातात पडल्यानंतर सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी जनजागृती करण्यासाठी बाहेर पडले आहेत.

Web Title: Notice to 122 big hotels in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.