नगर तालुक्यातील ७१ क्रशरचालकांना १६५ कोटींच्या वसुलीसाठी नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:18 AM2021-02-07T04:18:58+5:302021-02-07T04:18:58+5:30
केडगाव : नगर तालुका महसूल प्रशासनाने तालुक्यातील क्रशर चालकांना चांगलाच झटका दिला असून प्रथमच वीजबिलांवर रॉयल्टीची आकारणी सुरू केली ...
केडगाव : नगर तालुका महसूल प्रशासनाने तालुक्यातील क्रशर चालकांना चांगलाच झटका दिला असून प्रथमच वीजबिलांवर रॉयल्टीची आकारणी सुरू केली आहे. यामुळे तालुक्यातील ७१ क्रशरचालकांना १६५ कोटी रूपयांच्या वसुलीसाठी नोटिसा आल्या आहेत. या नोटीसांमुळे क्रशर चालक संतप्त झाले आहेत. त्यांनी क्रशर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तालुक्यात ७१ खडी क्रशर चालक असून त्यांची संघटना आहे. तालुक्यातील कापूरवाडी, पोखर्डी, खंडाळा, चास, घोसपुरी, सारोळा कासार, निंबोडी, देहेरे, मांडवा, राळेगण म्हसोबा, आगडगाव, वारूळवाडी आदी गावात खडी क्रशर आहेत. आतापर्यंत या सर्वांना ठराविक महसूल ठरवुन दिला जायचा. त्याप्रमाणे हा महसूल क्रशरचालक शासन दरबारी भरत. मात्र यावेळी प्रथमच महसूल प्रशासनाने तालुक्यातील ७१ क्रशर चालकांना वीजबिलांवर आधारित रॉयल्टीच्या (स्वामित्व धन) आकारणीसाठी नोटिसा पाठविल्या आहेत. प्रत्येकाला ४ ते ५ कोटींच्या नोटीस आल्याने क्रशर चालकांचे धाबे दणाणले आहेत. ७१ चालकांना मिळून १६५ कोटी रूपयांच्या नोटिसा आहेत.
महसूल प्रशासनाने प्रथमच वीजबिलावर रॉयल्टी आकारणी सुरू केली. मात्र हे फक्त नगर तालुक्यातच सुरू केले. क्रशरसाठी वीजचे युनीट वापराचे नियम विचारात न घेता नोटिसा पाठवल्या आहेत. याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एम. सोरमारे यांना निवेदन दिले आहेत. जोपर्यंत नोटिसा मागे घेतल्या जात नाहीत तोपर्यत आम्ही क्रशर सुरू करणार नाही, असे क्रशर चालकांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्व क्रशर पाच दिवसांपासून बंद आहेत.
यावेळी क्रशर चालक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक भगत, उपाध्यक्ष संपत लोटके, सचिव प्रभाकर घोडके, प्रविण कार्ले, सुरेश वारूळे, सुभाष आढाव, महादेव भगत, विशाल उजागरे, मिनिनाथ दुसुंगे, अजय कराळे आदी उपस्थित होते.
...
..तर शहरातील बांधकामावर होणार परिणाम
प्रशासनाच्या नोटिसांविरोधात क्रशरचालकांनी क्रशर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बांधकामासाठी लागणारी खडी, क्रश सॅन्ड, वॉश सॅन्ड निर्मिती बंद झाली. याचा परिणाम शहरात सुरू असलेल्य विविध बांधकामांवर होणार आहे. लवकर तोडगा न निघाल्यास कामे बंद पडतील.