गर्भलिंगनिदान प्रकरणी इंदोरीकर महाराजांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 10:50 PM2020-02-13T22:50:30+5:302020-02-13T22:51:01+5:30
इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचा भंग झाल्याचा आक्षेप आहे.
अहमदनगर - गर्भलिंगनिदान कसे करावे? याबाबत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे कीर्तनातून भाष्य करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी इंदोरीकर महाराजांना बुधवारी लेखी खुलासा करण्याबाबत नोटीस बजावली आहे.
इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचा भंग झाल्याचा आक्षेप आहे. व्हिडिओ आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने इंदोरीकर यांना नोटीस बजावली आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक तथा गर्भधारणापूर्व प्रसवपूर्व लिंग निवडीस प्रतिबंध करणाºया जिल्हा सल्लागार समितीचे (पीसीपीएनडीटी) सचिव डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले. यामध्ये महाराजांना लेखी खुलासा करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक भास्कर भवर यांनी ओझर येथे जाऊन बुधवारी ही नोटीस इंदोरीकर यांना समक्ष दिली आहे. ही नोटीस स्वत: इंदोरीकर यांनी स्वीकारली आहे, असे डॉ. मुरंबीकर म्हणाले.
अंनिसही करणार गुन्हा दाखल
समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज यांच्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या राज्य कार्यवाह अॅड. रंजना गवांदे यांनी दिली आहे.