महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यासह सहा कर्मचाऱ्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:57+5:302021-05-30T04:18:57+5:30
महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी कोरोनाचे सर्व नियम धुडकावत कार्यालयातच वाढदिवसाची पार्टी केली. सर्वसामान्य लोकांना रस्त्यावर फिरू ...
महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी कोरोनाचे सर्व नियम धुडकावत कार्यालयातच वाढदिवसाची पार्टी केली. सर्वसामान्य लोकांना रस्त्यावर फिरू न देणाऱ्या आयुक्तांनी या पार्टीला परवानगी कशी दिली? याबाबत प्रश्न उपस्थित करीत ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले, तसेच सोशल मीडियावरही या पार्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे आयुक्त गोरे यांनी तातडीने दखल घेत शनिवारी कारवाईची नोटीस बजावली आहे. २७ मे रोजी डॉक्टर बोरगे यांनी कार्यालयात कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत मास्क न वापरता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता, गर्दी जमवून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी व कार्यालयात गाणे गात असल्याबाबतची बातमी व्हायरल झालेली आहे. त्यामुळे बोरगे यांना कोरोनाबाबतचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत असून शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत असल्याचे नोटिसीत म्हटले आहे.
डॉ. बोरगे यांचे हे वर्तन कार्यालयीन शिस्त सोडून अत्यंत गैर, बेजबाबदारपणे, कामकाजामध्ये अक्षम्य असे दुर्लक्ष करणारे व महापालिकेची जनमानसात प्रतिमा मलिन करणारी आहे. त्यामुळे डॉ. बोरगे यांना वैयक्तिक जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायदा, महापालिका अधिनियम या अन्वये कारवाई का करू नये, याबाबतचा खुलासा २४ तासांत द्यावा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचे बजावण्यात आले आहे.
------
या कर्मचाऱ्यांनाही नोटीस
वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होणारे अधिकारी, कर्मचारी सतीश मधुकर मिसाळ, भाऊसाहेब बबनराव सुडके, विकास भानुदास गिते, महंमद जावेद गुलमोहंमद रंगरेज, किरण बलभीम खरात, धोडींबा देवजी भाकरे यांनाही ही नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्टीत सहभागी असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना मात्र सूट देण्यात आल्याचे दिसते आहे.
-----------