१८ हजार शासकीय कर्मचाऱ्यांना नोटिसा; काळे कपडे घालून केला शासनाचा निषेध
By साहेबराव नरसाळे | Published: March 17, 2023 02:04 PM2023-03-17T14:04:35+5:302023-03-17T14:04:59+5:30
जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारलेला आहे.
अहमदनगर - जुनी पेन्शन लागू करावी, यासाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. शुक्रवारी (दि.१७) संपाचा चौथा असून, शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामावर हजर व्हावे, यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. याच्या निषेधार्थ शासकीय कर्मचाऱ्यांनी काळे कपडे परिधान करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत शासनाचा निषेध नोंदविला.
जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारलेला आहे. अद्याप या संपाबाबत काहीही तोडगा निघालेला नाही. संप सुरुच असून कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काळ्या फिती लावून तसेच मोटारसायकल रॅली काढून प्रशासनाचा निषेध केला होता. तर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी काळे कपडे घालून शासनाच्याविरोधात निदर्शने केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.