कुख्यात गुंड बंटी राऊत नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 11:50 AM2020-11-29T11:50:51+5:302020-11-29T11:51:31+5:30
नगर शहरातील कुख्यात गुंड बंटी ऊर्फ भावेश राऊत (वय २९, रा. लाटेगल्ली, माणिक चौक, अहमदनगर) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
अहमदनगर : नगर शहरातील कुख्यात गुंड बंटी ऊर्फ भावेश राऊत (वय २९, रा. लाटेगल्ली, माणिक चौक, अहमदनगर) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
कोतवाली पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी अंतिम निर्णय घेऊन राऊत याला २७ नोव्हेंबरपासून एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने राऊत याला अटक करीत त्याची कारागृहात रवानगी केली आहे.
राऊत यांच्या विरोधात कोतवाली, तोफखाना पोलीस ठाण्यात शस्त्र जवळ बाळगणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, सरकारी कामात अडथळा, दरोडा टाकणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, दुखापत करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गुन्हेगारांसाठी आता ‘टू प्लस’ योजना
जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलात टू प्लस योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. अशा लोकांकडून येणाऱ्या काळात आणखी गुन्हे घडू नयेत यासाठी त्यांच्यावर संबंधित पोलीस स्टेशनकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी सांगितले़