कुख्यात गुंड विश्वजित कासार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:19 AM2021-01-18T04:19:36+5:302021-01-18T04:19:36+5:30
विश्वजित व त्याच्या साथीदारांनी वाळकी येथे १७ नोव्हेंबर रोजी ओंकार बाबासाहेब भालसिंग याला समोरून वाहनाने धडक देत लोखंडी पाईप ...
विश्वजित व त्याच्या साथीदारांनी वाळकी येथे १७ नोव्हेंबर रोजी ओंकार बाबासाहेब भालसिंग याला समोरून वाहनाने धडक देत लोखंडी पाईप व लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले होते. ओंकार याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये विश्वजित व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी फरार होता. विश्वजित हा पुणे परिसरातील वाघोली येथील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. माहितीनुसार पोलिसांनी वेषांतर करून सापळा रचला. विश्वजित हॉटेलजवळ येताच त्याला अटक केली. त्यानंतर त्याच्या तीन साथीदारांनाही विविध ठिकाणाहून अटक केली. या गुन्ह्यात पोलिसांनी विश्वजित याचा भाऊ इंद्रजितला आधीच अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणखी तीन आरोपी फरार आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक गणेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, पोलीस नाईक सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोढे, संदीप पवार, शंकर चौधरी, दीपक शिंदे, रविकिरण सोनटक्के, सचिन अडबल आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
उच्चशिक्षित विश्वजितवर अनेक गुन्हे
विश्वजित कासार याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे. त्याच्यावर २०१५ पासून पारनेर, कर्जत, एमआयडीसी, सुपा, कोतवाली व नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दंगा, फसवणूक, विनयभंग, सरकारी कामात अडथळा, आर्म ॲक्ट असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
फोटो १७ आरोपी
ओळी- तरुणाचा खून करून पसार झालेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.