आता कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:15 AM2021-07-01T04:15:26+5:302021-07-01T04:15:26+5:30
श्रीरामपूर : पावसाळा सुरू झाल्यानंतर भिजल्यामुळे कानात ओलावा राहून बुरशी होण्याचा धोका आता वाढला आहे. कान दुखत असल्यास त्याकडे ...
श्रीरामपूर : पावसाळा सुरू झाल्यानंतर भिजल्यामुळे कानात ओलावा राहून बुरशी होण्याचा धोका आता वाढला आहे. कान दुखत असल्यास त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र, त्यामुळे बहिरेपणाला सामोरे जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. असे असले तरी या बुरशीचा म्युकरमायकोसिसशी काहीही संबंध नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
कानांना बुरशी होण्यामागे जास्त काळ ओलावा राहणे हे मुख्य कारण आहे. पावसात भिजल्यानंतर अथवा आंघोळ केल्यानंतर कान कोरडे करून घेणे गरजेचे आहे. लहान मुलांच्या बाबतीत पालकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. ओलाव्यामुळे कानाला बुरशी जडते. मात्र शरीराच्या अन्य कोणत्याही भागाला तिचा प्रादुर्भाव होत नाही.
------
काय काळजी घ्यावी?
प्रत्येकाने कानात ओलावा राहणार नाही याची काळजी घ्यावी. कान नेहमी साफ ठेवले पाहिजेत. कोणत्याही कारणासाठी कानात काडी किंवा वाहनाची चावी घालता कामा नये. हेडफोन वापरताना वेळोवेळी त्याचे निर्जंतुकीकरण केले पाहिजे. इतर व्यक्तींचे हेडफोन वापरणे शक्यतो टाळायला हवे.
-------
पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका
कानाला बुरशी जडल्यामुळे पू होणे, कान गच्च होणे, सतत दुखणे असे त्रास जाणवतात. वेळीच उपचार केले नाहीत तर कमी ऐकू येणे, बहिरेपणा येणे, कानाचा पडदा फाटणे असा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे कानाचे कोणतेही दुखणे अंगावर काढता कामा नये.
-----
म्युकरमायकोसिसशी संबंध नाही
कानातील बुरशीचा आणि म्युकरमायकोसिसचा काहीही संबंध नाही. पावसाळ्यात नेहमीच अनेकांच्या कानांना संसर्ग होतो. ही साधी बुरशी असते. ती शरीराच्या आतमध्येही जात नाही. सर्दी, खोकला होतो. तेव्हाही काहींमध्ये कानात संसर्ग जातो.
डॉ. प्रणयकुमार ठाकूर,
सर्जन, श्रीरामपूर.
-----------