निवडणुका झाल्या आता सरपंचपद आरक्षणाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:18 AM2021-01-18T04:18:24+5:302021-01-18T04:18:24+5:30

सुपा : ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. आता निकाल लागण्याची प्रतीक्षा आहे. ग्रामपंचायत ताब्यात ठेवून गावकी सांभाळण्यासाठी सरपंचपदाचे आरक्षण नेमके काय ...

Now that the elections have taken place, look at the Sarpanch reservation | निवडणुका झाल्या आता सरपंचपद आरक्षणाकडे लक्ष

निवडणुका झाल्या आता सरपंचपद आरक्षणाकडे लक्ष

सुपा : ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. आता निकाल लागण्याची प्रतीक्षा आहे. ग्रामपंचायत ताब्यात ठेवून गावकी सांभाळण्यासाठी सरपंचपदाचे आरक्षण नेमके काय असेल, याचा अंदाज करीत गावकारभारी जुळवाजुळवीच्या कामाला लागले आहेत.

पारनेर तालुक्यातील सुपा परिसर राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्वाचा आहे. याच परिसरातील हंगा गावचे रहिवासी निलेश लंके आमदार आहेत. वाडेगव्हाण येथील गणेश शेळके पंचायत समितीचे सभापती आहेत. सुपा परिसरातून जाणाऱ्या नगर-पुणे रस्त्यामुळे गावे समृद्धीकडे वाटचाल करीत असताना १९९२ मध्ये याच भागात आलेली एमआयडीसी व आता तिच्या टप्पा- २ व टप्पा- ३ मुळे होत असणाऱ्या विस्ताराने कायापालट होणार असून त्यातून ग्रामपंचायत व सरपंच पदाभोवती निर्माण झालेले प्रतिष्ठेचे वलय यामुळे ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या झाल्या. आता लक्ष लागले आहे ते सरपंचपदाच्या आरक्षणाकडे. लवकरच आरक्षण निघेल मग बहुमतासाठी जुळवाजुळव करावी लागेल. त्या दिशेने जर तरचा विचार करत आपले कोणते सदस्य निवडून येतील. कुणाची कशी मदत होऊ शकते. याबाबत खलबते सुरू झाली आहेत. पूर्वतयारी करताना गुप्त बैठका घेतल्या जात आहेत.

काही जण नंतरचे नंतर बघू म्हणत सध्या काहीच ताणतणाव नको म्हणत विषय बाजूला सारताना दिसतात. सुपा परिसरात प्रत्येक ठिकाणी प्रस्थापित सत्ताधीशाविरोधात परिवर्तनाची हाक देत बदल घडवणारी मंडळी निवडणुकीत उतरली. मतदारांनी नेमकी कुणाला साथ दिली ते आज समोर येईल. सुप्यात १५ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत एका गावच्याच मतदानाइतके एका प्रभागात मतदार होते. राजकीय पक्षाऐवजी स्थानिक गट-तट निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

वाघुंडे खुर्दमध्ये सरपंचाच्या गटाला शह देण्यासाठी माजी सरपंच समर्थक तर बुद्रूकमध्ये ४ माजी सरपंच एक बाजूला व त्यांच्या स्पर्धेसाठी नवखी मंडळी रिंगणात उतरली होती. निर्मलग्राम पुरस्कार पटकावलेल्या आपधूपमध्ये विद्यमान सरपंच गटाचा सामना करण्यासाठी तीन माजी सरपंचांनी एक गट निर्माण केला. म्हसणे, बाबुर्डी, पळवे या गावातही निवडणूक चांगलीच रंगली.

सुपा गावचे सरपंचपद राजकीयदृष्ट्या वजनदार आहे. मोठा बाजार, महामार्ग, एमआयडीसी, उद्योधंद्यांची भरभराट यामुळे हे पद प्रतिष्ठेचे असून ते मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड चाललेली दिसते. हंगा, वाघुंडे खुर्द व बुद्रूक, आपधूप, पळवे, म्हसणे, बाबूर्डी व सुपा या गावच्या शिवारात एमआयडीसी असल्याने या गावच्या सरपंचाची एमआयडीसीतील कारखान्यात होणारी महत्त्वपूर्ण उठबस, प्रतिष्ठा, चार पैसे कमावण्याची जागा म्हणून पाहण्याच्या वृत्तीने ते पद महत्त्वाचे आहे. ते मिळविण्यासाठी चुरस निर्माण होणार आहे. त्यामुळे अगोदरच जुळवाजुळव केली तर गणित बिघडणार नाही, या आशेने चर्चेच्या फैरी झडताना दिसत आहेत.

---

अद्याप सरपंचपद आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. बहुतेक पुढच्या आठवड्यात याबाबत कार्यक्रम येईल. त्यानुसार गावोगावच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित केले जाईल.

-सुधाकर भोसले,

उपविभागीय अधिकारी

Web Title: Now that the elections have taken place, look at the Sarpanch reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.