आता अपंगांनाही मिळणार रोहयोवर कामे; जिल्हा प्रशासनाला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 02:25 PM2020-06-19T14:25:10+5:302020-06-19T14:26:39+5:30

लॉकडाऊनच्या काळात दिव्यांग व्यक्तींचा रोजगार हिरावला गेला आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने दिव्यांगांना रोजगार हमीवरील सुलभ कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. 

Now people with disabilities will also get jobs on Rohyo | आता अपंगांनाही मिळणार रोहयोवर कामे; जिल्हा प्रशासनाला सूचना

आता अपंगांनाही मिळणार रोहयोवर कामे; जिल्हा प्रशासनाला सूचना

चंद्रकांत शेळके । 

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात दिव्यांग व्यक्तींचा रोजगार हिरावला गेला आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने दिव्यांगांना रोजगार हमीवरील सुलभ कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. 

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) शासनाने सुरू केली. या योजनेतून मागेल त्याला किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो. रोहयोतून घरकुले, शौचालये, विहीर खोदाई, गोठे बांधणी या वैयक्तिक लाभाच्या कामांसह सामूहिक शेततळे, सामूहिक मत्स्य तळे, शाळेसाठी संरक्षक भिंत, मैदानासाठी साखळी कुंपण, ग्रामपंचायत भवन, काँक्रिट नाला बांधकाम, शालेय स्वयंपाक घर, गॅबियन बंधारा, सिमेंट नाला, रस्ते आदी कामे जॉबकार्ड असलेल्या कामगारांमार्फत केली जातात. 

सध्या रोहयोची सुमारे १० हजार मजुरांकरवी १४०० कामे जिल्ह्यात सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वच यंत्रणा ठप्प असल्याने रोजगार हमीवरील कामेही थांबली होती. मागील वर्षी (२०१९) उन्हाळ्याच्या एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांत जिल्ह्यात रोहयोवर १ लाख ६ हजार मजूर होते. परंतुु यंदा लॉकडाऊनमुळे ही संख्या कमालीची घटली. एप्रिल, मे व जून (१५ जूनपर्यंत) २०२० या अडीच महिन्यात केवळ ३५ हजार मजूर कामावर होते. 

लॉकडाऊनचा हा फटका सर्वांनाच बसला. अनेकांचे हक्काचे रोजगार हिरावले गेले. त्यातही दिव्यांग व्यक्तींची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे शासनाने दिव्यांगांची होणारी उपासमार थांबवण्यासाठी त्यांना रोहयोवर कामे उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

शासनाच्या दिव्यांग आयुक्तालयाकडून ८ मे २०२० रोजी याबाबतचे परिपत्रक विभागीय आयुक्त व तेथून प्रत्येक जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे. त्यानुसार अपंगांना रोहयोची कामे उपलब्ध करून देण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाल्या आहे.

जिल्ह्यात रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. लॉकडाऊनमुळे मध्यंतरी मजुरांची उपस्थिती काहीशी कमी झाली होती. परंतु हळूहळू आता ती वाढत आहे. या वर्षीपासून अपंगांनाही रोजगार देण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 
    - जी. के. वेले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, रोहयो 

Web Title: Now people with disabilities will also get jobs on Rohyo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.