आता तयार होणार दर्जेदार डांगीची पैदास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:15 AM2021-01-10T04:15:45+5:302021-01-10T04:15:45+5:30
तालुक्यातील केळी रुम्हणवाडी येथील धोंडिबा किसन बिन्नर यांनी आपल्या कष्टाने या भागातील प्रसिद्ध असलेल्या डांगी वळूंची पैदास, त्यांचे ...
तालुक्यातील केळी रुम्हणवाडी येथील धोंडिबा किसन बिन्नर यांनी आपल्या कष्टाने या भागातील प्रसिद्ध असलेल्या डांगी वळूंची पैदास, त्यांचे संगोपन अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने करून घरामध्ये चॅम्पियन वळू घडवण्याचा इतिहास रचला आहे. डांगी प्रजातीला जास्त पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये शेतीसाठी अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे. डांगी पशुधनाला नैसर्गिकदृष्ट्या लाभलेले काटक शरीर, तेलकट त्वचा त्यावर जास्त पावसाचे पाणी राहत नाही. ते वगळून खाली जाते. मजबूत खांदा, बेंबाट, मध्यम आकाराचे पोट, सफेद आणि काळा ठिपके रंग, लांब शेपटी, तजेलदार त्वचा, मोठे डोळे ही अस्सल डांगी वळूची लक्षणे मानली जातात. नैसर्गिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मानले जाणारी ही प्रजाती या भागासाठी वरदान ठरलेली आहे.
घोटी व राजूर येथील प्रदर्शनात धोंडिबा किसन बिन्नर यांचा वळूला एकाच वर्षात दोनदा चॅम्पियन बनण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. रोज सकाळी खुराक म्हणून शेंगदाने दिले जातात व दुपारच्या आहारामध्ये गहू-बाजरीचे पीठ व कडधान्य यांचे मिश्रण खायला दिले जाते.
तसेच संध्याकाळी सकस हिरवा चारा दिला जातो. बिन्नर यांनी गोठ्यामध्ये चार ते पाच चॅम्पियन निर्माण करून पंचक्रोशीत आपले नाव कमावले आहे. चॅम्पियनचा चॅम्पियन, ही बिरुदावली मिळालेली आहे. त्यांनी संगोपन केलेल्या वळूला बाजारामध्ये एक लाखापेक्षाही जास्त किंमत देऊन विकत घेणारी शेतकरी मंडळी आहेत. उदात्त हेतूने पैशाकडे न बघता हा वळू नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राम कर्नाल येथे देण्याचे ठरवले आहे. तेथे या वळूपासून कृत्रिम रेतनापासून दर्जेदार पशुधन निर्माण करता येणार आहे.
( ०९ डांगी)