आता दुसऱ्या कारवाल्या टोळीने सुरू केली लूटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:18 AM2021-04-12T04:18:45+5:302021-04-12T04:18:45+5:30
माळीवाडा बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता नामदेव विठ्ठल पाखरे (वय ६०, रा. वडुले, शेवगाव) हे पाथर्डी येथे जाण्यासाठी ...
माळीवाडा बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता नामदेव विठ्ठल पाखरे (वय ६०, रा. वडुले, शेवगाव) हे पाथर्डी येथे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत होते. याचवेळी त्यांच्याजवळ एक सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार आली. कारमधील चौघांनी ‘तुम्हाला पाथर्डी येथे सोडतो’ असे म्हणून पाखरे यांना कारमध्ये बसविले. ही कार पाथर्डी रोडवरील शहापूर परिसरात आली तेव्हा चोरट्यांनी कार थांबवून पाखरे यांच्या डोळ्यात स्प्रे मारला. तसेच चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील २१ हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेत त्यांना तेथेच सोडून दिले. या घटनेने हादरून गेलेल्या पाखरे यांनी पुन्हा नगरमध्ये येऊन कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कारमधील लुटारू २२ ते २५ वयोगटातील चौघे जण असल्याचे पाखरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक भंगाळे हे पुढील तपास करत आहेत.
............
या टोळीचा छडा लागेल का?
माळीवाडा बस स्थानक परिसरातून प्रवाशांना कारमध्ये बसवून त्यांची लूटमार करणाऱ्या चौघांना नुकतेच कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीने अशा पद्धतीने अनेकांची लूटमार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आता पुन्हा याच पद्धतीने लूटमार करणाऱ्या टोळीचा छडा लावणे हे कोतवाली पोलिसांसमोर नवे आव्हान आहे.
............
माळीवाडा बस स्थानकच का?
माळीवाडा बस स्थानक शहरातील मध्यवर्ती व मुख्य ठिकाण आहे. येथून एसटी बस व इतर खासगी वाहने प्रवासासाठी मिळतात. त्यामुळे प्रवासी येथेच येऊन थांबतात. हीच संधी साधून लुटारू प्रवाशांना हेरून कारमध्ये बसवून त्यांची लूटमार करतात. गेल्या वर्षभरात अशा पद्धतीने प्रवाशांच्या लूटमारीच्या अनेक घटना घडल्या आहेत.