बालकाचे वजन कळणार आता ‘एसएमएस’व्दारे
By Admin | Published: September 18, 2014 11:19 PM2014-09-18T23:19:48+5:302024-10-21T17:22:23+5:30
ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने वजन सनियंत्रण प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर
अंगणवाडीत जाणाऱ्या सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे कुपोषण टाळता यावे, प्रत्येक बालकाचे वजन त्यांच्या माता-पित्याला कळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने वजन सनियंत्रण प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात अंगणवाडीत येणाऱ्या प्रत्येक बालकाचे महिन्यांतून वजन करण्यात येणार आहे. त्यात कमी वजन असणाऱ्या, कुपोषित बालकाची माहिती संबंधित माता-पित्यांना आणि अधिकाऱ्यांना ‘एसएमएस’व्दारे कळविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्यावतीने कुपोषण मुक्तीसाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. नगरचा डिजीटल अंगणवाडी प्रकल्प राज्यस्तरावर पोहचला आहे. आता शाश्वत कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून नाविन्यपूर्ण योजनेतून अंगणवाडीत येणाऱ्या सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे वजन मोजण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी वजन असणाऱ्या बालकांची माहिती संबंधित माता-पिता, अंगणवाडी सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मोबाईलच्या माध्यमातून एसएमएसव्दारे मिळणार आहे. यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाने साडेतीन हजार इलेक्ट्रॉनिक वजन काटे खरेदी केले असून त्यात वय आणि उंचीनुसार वजनाची माहिती फिड करण्यात आलेली आहे. संबंधित बालकाचे वजन केल्यानंतर ते अधिक आहे की कमी आहे. तो कुपोषणाला बळी पडण्याची शक्यता आहे का? याची माहिती त्या यंत्रात संकलित होणार आहे. त्यानंतर ती माहिती वजन काट्यातून तालुक्याच्या ठिकाणी प्र्रकल्प कार्यालयात आणि तेथून इंटरनेटच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर तालुका, गाव आणि बालकाच्या नावनिहाय संकलित होणार आहे.