आता पर्याय नाही...असे म्हणत शेतकऱ्याने दिला आत्महत्येचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:21 AM2021-05-13T04:21:20+5:302021-05-13T04:21:20+5:30
अहमदनगर : शेतकरी आत्महत्या करत नाही तर सरकारच त्याला प्रवृत्त करतं, असं म्हणत कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील बापू दादा ...
अहमदनगर : शेतकरी आत्महत्या करत नाही तर सरकारच त्याला प्रवृत्त करतं, असं म्हणत कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील बापू दादा चव्हाण या शेतकऱ्याने एका व्हिडिओद्वारे आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. हा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जलसंपदा विभागाच्या चुकीमुळे कालव्यातून गळणारे पाणी चव्हाण यांच्या शेतात येते. गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी त्यांच्या शेतीला तळ्याचे स्वरूप येते. अनेकदा पाठपुरावा करूनही कालव्याची दुरुस्ती होत नसल्याने हताश झालेल्या चव्हाण यांनी शेतात साचलेल्या पाण्याशेजारी बसून हा व्हिडिओ शूट करत आत्महत्येचा इशारा दिला आहे. शिर्डीजवळ चारीच्या शेजारी चव्हाण यांची दोन एकर दहा गुंठे शेती आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणातून जेव्हा-जेव्हा आवर्तन सुटते तेव्हा चारीतून गळती होऊन चव्हाण यांच्या शेतात तळे साचते. त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होते, तसेच पुढील पीकही घेता येत नाही. यामुळे मोठे नुकसान होत असल्याचे चव्हाण यांचे गाऱ्हाणे आहे. याबाबत त्यांनी जलसंपदा विभागाला जबाबदार धरले आहे. जेथे पाणी जाऊ शकत नाही, तेथे ते बळजबरीने नेऊन इतरांची मोठमोठी शेततळी भरली जातात. त्यासाठी दीर्घकाळ पाणी सुरू राहते. त्यामुळे माझ्या शेतात पाणी साचते. गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. यामुळे कर्जबाजारी झालो आहे. आपल्यासह आणखी काही शेतकऱ्यांना हा त्रास होत आहे. याबाबत जलसंपदा विभागाकडे तक्रारी केल्या मात्र काहीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असं चव्हाण यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. दरम्यान, सदर शेतकऱ्याच्या व्हिडिओबाबत आमच्यापर्यंत काहीच माहिती आली नसल्याने कोपरगाव तालुका पोलिसांनी सांगितले आहे.
--------------------------
धरणातून जेव्हा आवर्तन सुटते तेव्हा माझ्या शेतात पाणी साचते. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत जलसंपदा विभाग व तहसीलदार यांना २०१७ पासून तक्रारी करत आहे. मात्र, काहीच दखल घेतली गेली नाही. मंगळवारी जलसंपदा विभागातील काही कर्मचारी शेतात आले होते. उपाययोजना करतो, असे त्यांनी सांगितले. मात्र, अजूनतरी काहीच त्यांनी केलेले नाही. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप काहीच दखल घेतलेली नाही.
- बापू चव्हाण, शेतकरी, धारणगाव, ता. कोपरगाव
फोटो १२ बापू चव्हाण