मुस्लिमांपेक्षा हिंदुंनाच एनआरसीचा फटका अधिक-बी. जी. कोळसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 01:21 PM2020-03-13T13:21:57+5:302020-03-13T13:23:09+5:30

केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे कायदे मुस्लिमविरोधात नसून मुस्लिम फक्त बहाणा आहे. खरं तर देशातील ५० टक्के लोकांकडे जन्माचे दाखलेच नाहीत. परिणामी एनआरसीचा फटका मुस्लिमांपेक्षा हिंदुंनाच अधिक बसणार आहे.

NRC hits more Hindus than Muslims - B Yes. Coal | मुस्लिमांपेक्षा हिंदुंनाच एनआरसीचा फटका अधिक-बी. जी. कोळसे 

मुस्लिमांपेक्षा हिंदुंनाच एनआरसीचा फटका अधिक-बी. जी. कोळसे 

अहमदनगर : केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे कायदे मुस्लिमविरोधात नसून मुस्लिम फक्त बहाणा आहे. खरं तर देशातील ५० टक्के लोकांकडे जन्माचे दाखलेच नाहीत. परिणामी एनआरसीचा फटका मुस्लिमांपेक्षा हिंदुंनाच अधिक बसणार आहे. त्यामुळे सर्वांनीच या कायद्याविरोधात रस्त्यावर येण्याची गरज असल्याचे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले. 
गुरूवारी ‘लोकमत’ कार्यालयात आले असता त्यांनी एनआरसी, सीएएवर सविस्तर भाष्य केले. मोदी सरकार एनआरसीच्या माध्यमातून देशात अराजकता पसरवत आहे. ज्यांना संविधानाने या देशाचे नागरिकत्व बहाल केले आहे, त्यांना पुन्हा नागरिकत्व सिद्ध करायला लावले जात आहे. वरकरणी एनआरसी, सीएए हे मुस्लिमविरोधात दिसत असले तरी प्रत्यक्षात त्याचा फटका देशातील एससी, एसटी, ओबीसी यांनाच अधिक बसणार आहे. 
कारण एनआरसीसाठी जन्माचे पुरावे मागितले जात आहेत. प्रत्यक्षात १९८५ च्या आधी जन्मलेल्या  बहुतांश लोकांकडे असे पुरावेच नाहीत. देशात अशी निम्मी लोकसंख्या आहे. मूठभर देशविरोधी लोकांना बाहेर काढण्यासाठी हे सरकार पूर्ण देशाला वेठीस धरत  आहे.  हा प्रकार म्हणजे घरात  घुसलेला ढेकूण काढण्यासाठी घरच पेटवून देण्यासारखा आहे, असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला.
देशावर आधी ५० लाख  कोटींचे कर्ज होते. त्यात मोदी सरकारने ४० लाख कोटींची भर टाकली. हे कर्ज घेऊन उद्योगपतींना सवलतीची खैरात केली, तर दुसरीकडे गरिबांच्या हातातून पैसा काढून घेतला. त्यामुळे मंदीचे वातावरण तयार झाले आहे, असे कोळसे पाटील म्हणाले.
निवडणुकीसाठी युध्द
मोदी सरकार भावनिक मुद्दे करून निवडणुका जिंकते. पुलवामा, ३७० कलम आदी मुद्दे आता संपले आहेत. त्यामुळे २०२४च्या निवडणुकीवेळी पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी युद्ध छेडले जाईल. त्यातून देशभर भावनिक वातावरण करून निवडणुका पदरात पाडल्या जातील. यात दोन्ही देशांचे नुकसान करण्याचा डाव मोदी सरकारचा आहे, असा आरोपही कोळसे पाटील यांनी केला. 
दिल्लीची दंगल गुजरात पॅटर्न
सीएएविरोधात मुस्लिम महिलांनी दिल्लीत छेडलेले आंदोलन चिरडण्यासाठी दिल्लीत गुजरात पॅटर्न दंगल घडवण्यात आली. भाजपचे नेते वेळोवेळी हे आंदोलन मोडून काढण्याची भाषा करत होते, असा गंभीर आरोपही कोळसे यांनी केला. 

Web Title: NRC hits more Hindus than Muslims - B Yes. Coal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.