ग्रामीण रुग्णालयातील बेड्सची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:14 AM2021-06-11T04:14:45+5:302021-06-11T04:14:45+5:30
श्रीरामपूर : येथील ग्रामीण रुग्णालयालातील बेड्सची संख्या कोरोना संकटात ३० वरून ५० पर्यंत वाढविली. त्याकरिता स्वत: पुढाकार घेऊन ३० ...
श्रीरामपूर : येथील ग्रामीण रुग्णालयालातील बेड्सची संख्या कोरोना संकटात ३० वरून ५० पर्यंत वाढविली. त्याकरिता स्वत: पुढाकार घेऊन ३० लाख रुपयांचा निधी दिला. त्यामुळेच उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळू शकला, अशी माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील पाच ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून त्यांचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर केले. त्यात श्रीरामपूरचा समावेश झाल्याने तालुकावासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार कानडे यांनी अधिक माहिती दिली.
कानडे म्हणाले, राज्य सरकारने जानेवारी २०१३ मध्ये आदेश पारित केलेला आहे. त्यानुसारच रुग्णालयांचे श्रेणीवर्धन केले जाते. श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयातील बेड्सची संख्या प्रयत्नपूर्वक व दूरदृष्टी ठेवून वाढविल्याने त्यास उपजिल्ह्याचा दर्जा मिळाला.
५० बेड्सच्या रुग्णालयाच्या आकृतिबंधानुसार ४५ पदांपैकी ८ नियमित, तर १२ मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात बाह्य यंत्रणेद्वारे भरल्या जाणार आहेत. याचाच अर्थ ४० नियमित पदे निर्माण करण्यास व ६० वैद्यकीय सेवा या बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास सरकारची मान्यता मिळाली आहे.
ग्रामीण रुग्णालयाला वाढीव बेड्ससाठी नव्याने बांधकाम हाती घेतले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन होत आहे. त्यामुळे पुढील काळात १०० बेड्सचे रुग्णालय उभारण्याचा आपला मानस आहे. जनरेटर, रुग्णवाहिकादेखील येथे सेवेत दाखल झाल्या आहेत, अशी माहिती आमदार कानडे यांनी दिली.
याचबरोबर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे येथे गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा तालुक्यातील रुग्णांना मिळतील, असा विश्वास कानडे यांनी व्यक्त केला.
----------
भविष्यातील रुग्णांची गरज ओळखून भरीव आर्थिक मदतीतून ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार करण्याचा प्रयत्न आहे. त्याकरिता सरकार दरबारी पाठपुरावा करण्याबरोबरच निधी दिला जाईल.
- लहू कानडे,
आमदार, श्रीरामपूर.
----------