स्थलांतरीत कामगारांचा आकडा चारशे पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:06 PM2020-04-25T17:06:21+5:302020-04-25T17:06:44+5:30
लॉकडाऊनच्या काळातही पायी गावाकडे निघालेल्या स्थलांतरीत कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेच्या निवारागृहात शुक्रवारी (दि़ २४) नव्याने २४ जण दाखल झाले आहेत
अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळातही पायी गावाकडे निघालेल्या स्थलांतरीत कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेच्या निवारागृहात शुक्रवारी (दि़ २४) नव्याने २४ जण दाखल झाले आहेत. त्यामुळे निवारागृहातील स्थलांतरीत कामगारांची संख्या ४१० झाली आहे़
सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अनेक कामगार कामाच्या ठिकाणी अडकून पडले़ गेल्या महिनाभरापासून हे कामगार मिळेल ते खाऊन दिवस काढत आहेत़ मात्र काहीजणांचे कुटुंब गावाकडे असल्याने त्यांना गावाकडची चिंता आहे़ लॉकडाऊनच्या काळातही स्थलांतरीत कामगार वाहने मिळत नसल्याने पायी गावाकडे निघालेले आहेत़ जिल्हाबंदी असल्याने पोलीस स्थलांतरीत कामगारांना पकडून त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात पाठवितात़ रुग्णालयातून त्यांना निवारागृहात पाठविले जाते़ शहर व परिसरातून जाणारे चारशेहून अधिक जणांना पकडून महापालिकेच्या निवारागृहात ठेवण्यात आले आहे़ तिथे त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय करण्यात आली आहे़ दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये ही संख्या अचानक वाढली़ त्यामुळे महापालिका प्रशासनाला येणाऱ्यांची व्यवस्था करताना चांगलीच कसरत करावी लागली़ महापालिकेने मंगल कार्यालये अधिग्रहीत केली असून, त्या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली आहे़ मंगल कार्यालये कमी पडल्याने नव्याने बुरुडगाव येथील कार्यालय घेण्यात आला आहे़
अन्नछत्रातून १७०० जणांना जेवण
महापालिकेने हातावर पोट असणा-यांसाठी दोन अन्नछत्र सुरू केले आहेत़ तिथेही मागणी वाढू लागली असून, शुक्रवारी दिवसभरात १ हजार ७०० नागरिकांना अन्नाची पाकिटे देण्यात आली आहेत़ याशिवाय सामाजिक संस्थांमार्फत अन्नाचे वाटप सुरू आहे़
स्थलांतरीत कामगार येत आहेत़ त्यांची जेवनाची व राहण्याची सोय करण्यात आली आहे़ गुरुवारी नव्याने २४ जण दाखल झाले असून, ही संख्या आता चारशेहून अधिक झाली आहे़ गरज पडल्यास आणखी मंगल कार्यालये ताब्यात घेण्यात येतील. -सुनील पवार, उपायुक्त, महापालिका