रुग्णसंख्या घटली, मृत्यूसंख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:20 AM2021-05-24T04:20:18+5:302021-05-24T04:20:18+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना मृत्यूची संख्या अचानक वाढलेली आहे. दोन दिवसांपासून रुग्णसंख्या दोन ...

The number of patients decreased, the number of deaths increased | रुग्णसंख्या घटली, मृत्यूसंख्या वाढली

रुग्णसंख्या घटली, मृत्यूसंख्या वाढली

अहमदनगर : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना मृत्यूची संख्या अचानक वाढलेली आहे. दोन दिवसांपासून रुग्णसंख्या दोन हजारांच्या आत आली आहे. दुसरीकडे दोन दिवसांत १७९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर नोंद झाली आहे.

जिल्ह्यात रविवारी २७९९ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३० हजार ४०३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.७१ टक्के इतके झाले आहे. रविवारी जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत १८५१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५ हजार २८४ इतकी झाली आहे. उपचार घेण्याऱ्या रुग्णांची संख्या गत आठवड्यात २७ हजारांपर्यंत होती. त्यामध्ये मोठी घट झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. मात्र, मृत्यूंची संख्या पुन्हा वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शनिवारी ९६ कोरोना रुग्णांचा तर रविवारी ८३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तशी नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर करण्यात आली आहे. सदरचे मृत्यू आठ दिवसांतील असून एकाच वेळी नोंद झाल्याने ही संख्या वाढल्याचे दिसते, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३७०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४९३ आणि अँटिजन चाचणीत ९८८ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये दहा तालुक्यांतील रुग्णसंख्या शंभरच्या वर असल्याचे दिसते आहे. नगर शहरातील रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. अहमदनगर (१७३), संगमनेर (२२०), पारनेर (१८१), अकोले (१५५), श्रीगोंदा (१४२), पाथर्डी (१२७), नगर ग्रामीण (१३२), कोपरगाव (१२२), नेवासा (१११), राहुरी (१११) या तालुक्यांत रुग्ण वाढले आहेत.

-------

तरुणांची संख्या तीनशेवर?

रविवारी एकूण १८५१ या रुग्णसंख्येत १८ वर्षे वयोगटातील रुग्णसंख्या ३७५ इतकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, आरोग्य यंत्रणेने वयोगटानुसार कोणतीही अधिकृत आकडेवारी दिली नाही. त्यामुळे १८ च्या आतील नक्की किती बाधित आहेत, याचा आकडा कळू शकला नाही. दरम्यान, लहान मुलांवरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षही तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने टास्क फोर्सही तयार करण्यात आला आहे.

----

कोरोना स्थिती

बरे झालेले रुग्ण : २,३०,४०३

उपचार सुरू असलेले रुग्ण : १५२८४

मृत्यू : २८२९

एकूण रुग्ण : २,४८,५१६

Web Title: The number of patients decreased, the number of deaths increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.