शेवगावला बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची संख्या वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:39 AM2021-02-28T04:39:22+5:302021-02-28T04:39:22+5:30
शेवगाव : शेवगाव शहरासह तालुक्यात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २३ दिवसांत तीन गावठी पिस्तूल पोलिसांनी विविध ...
शेवगाव : शेवगाव शहरासह तालुक्यात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २३ दिवसांत तीन गावठी पिस्तूल पोलिसांनी विविध ठिकाणी हस्तगत केले. यामध्ये काहींना अटकही केली आहे.
मराठवाड्यातील सीमेवर वसलेल्या गाव-वाड्यांची हक्काची बाजारपेठ म्हणून शेवगावकडे पाहिले जाते. व्यापार, उद्योग व जिनिंग व्यवसायाचे प्रमुख केंद्र ठरलेल्या तालुक्याची ओळख आता गुन्हेगारी विश्वामुळे बदलते की काय अशी कुशंका निर्माण झाली आहे. बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या गुंड प्रवृत्तींच्या लोकांच्या मुसक्या आवळून पुढील तपास लावण्याचे आव्हान शेवगाव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे या गुन्हेगारी वृत्तीचा कसा बीमोड करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
काही महिन्यांपूर्वी सुदर्शन मुंढे व प्रभाकर पाटील यांनी पदभार हाती घेताच अवैध व्यवसायाचा बीमोड करण्याचे काम हाती घेतले. ३ ते २६ फेब्रुवारीदरम्यानच्या काळात पोलिसांनी बेकायदा गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना तर विक्रीसाठी आलेल्या तिघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. गदेवाडी, कोनोशी ते नांदूर रस्त्यावर, तसेच भातकुडगाव फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. २३ दिवसांत तीन गावठी कट्टे पकडण्यात आले.
सहकार क्षेत्रात आघाडीवर राहिलेल्या तालुक्यात गुन्हेगारीची पाळेमुळे रोवली जात तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पकडलेल्या आरोपींनी गावठी पिस्तूल कुठून, कसे आणले, कोणी पुरविले, ते जवळ बाळगण्याचे कारण काय, अशा बाबींचा शोध घेऊन पोलिसांनी याची पाळेमुळे शोधायला हवीत.
---
रेती व्यवसायातही पिस्तूलची क्रेझ..
तालुक्याच्या पश्चिमेला असलेले जायकवाडी धरण, पूर्वेकडील बाजूला विस्तीर्ण असे गोदावरी नदीचे पात्र रेती तस्करीचे केंद्र बनले आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. यातील काही तस्करांची तर थेट महसूल, पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याइतपत मजल गेली आहे. गावकऱ्यांमध्ये दहशत माजविण्यासाठी बेकायदा गावठी पिस्तूलचा वापर केला जात असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येते.
----
अन् शेवगाव पोहोचले राज्यभर..
बारामतीच्या गुन्हे शोध पथकाने बेकायदा पिस्तूल विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ४ फेब्रुवारी रोजी जेरबंद केले. पिस्तूल पुरविणाऱ्या म्होरक्यांसह गुन्हेशोध पथकाने १२ पिस्तूलसह २० काडतुसे जप्त करून टोळीला गजाआड केले. त्यात पाथर्डी तालुक्यातील एक, तर शेवगाव तालुक्यातील चौघांचा समावेश होता. त्यामुळे शेवगाव तालुका राज्यभर चर्चेत आला.