महापालिकेतील शहर अभियंत्यावर बूट भिरकावल : सेनेचे अनिल राठोडसह नगरसेवकांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:35 AM2019-04-27T11:35:45+5:302019-04-27T11:36:11+5:30
महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या देत शिवसेनेचे मदन आढाव यांनी शहर अभियंता विलास सोनटक्के यांना बूट फेकून मारला़
अहमदनगर: महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या देत शिवसेनेचे मदन आढाव यांनी शहर अभियंता विलास सोनटक्के यांना बूट फेकून मारला़ दरम्यान या घटनेचा निषेध करत महापालिकेच्या अभियंत्यांनी माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह १५ जणांविरोधात शुक्रवारी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़ त्यामुळे सेना विरुध्द पालिका अधिकारी, असा नवा वाद महापालिकेत उफळून आला आहे़
बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक, या रस्त्याचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी सेनेचे अशोक बडे, कमल सप्रे, यांच्यासह रिता भाकरे, दत्तात्रय सप्रे, मदन आढाव, शैलेश भाकरे, विशाल वालकर, हे मोर्चाने महापालिकेत दाखल झाले़ महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनात त्यांनी फरशीवर ठ्य्यिा दिला़ काही वेळातच शिवसेना उपनेते अनिल राठोड व गिरीश जाधव यांच्यासह शिवसैनिक आंदोलनस्थळी आले़
यावेळी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मदन आढाव यांनी पायातील बूट काढून तो सोनटक्के यांच्या दिशेने भिरकावला़ पण, तो त्यांनी चुकविला़ त्यामुळे अनर्थ टळला़ आयुक्तांच्या उपस्थित अभियंत्यावर बुट भिरकविण्याच्या घटनेचा महापालिकेतील अभियंत्यांनी निषेध करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली़ दरम्यान आयुक्त भालसिंग यांनी पोलिसांना पाचारण केले़ तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकासह पोलिसांचा मोठा फौजफाटा पालिकेत दाखल झाला़ परंतु, त्यापूर्वीच आंदोलनकर्ते पालिकेतून निघून गेले होते़