नर्सिंगच्या विद्यार्थिनींना मिळेनात महामंडळाच्या बसचे पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:38 AM2021-03-04T04:38:47+5:302021-03-04T04:38:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना एस. टी. महामंडळाकडून सवलतीचे मासिक पास मिळत नाहीत. त्यामुळे मोठा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना एस. टी. महामंडळाकडून सवलतीचे मासिक पास मिळत नाहीत. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसत असून आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थिनींना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.
राज्य शासनाने मुलींसाठी मोफत शिक्षणाची तरतूद केली आहे. ज्या विद्यार्थिनी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी महामंडळाच्या बसमधून येतात. त्यांना मासिक प्रवासी पासमध्ये शंभर टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच त्यानंतरचे तंत्र व व्यावसायिक शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थिनींना मासिक पासमध्ये सवलत देण्याचा शासन निर्णय आहे. परंतु, नर्सिंगचे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मात्र, शासन निर्णयानुसार सवलतीच्या दरात मासिक पास मागूनही दिले जात नाही. त्यावर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कशामुळे हे पास देणे बंद केले, असे विचारले तर त्याचेही उत्तर दिले जात नाही. त्यामुळे नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी दररोज भाडे खर्चून यावे लागत आहे. परंतु, हा खर्च पालकांना पेलवत नसल्याने अनेक प्रवेश घेतलेल्या अनेकांना अर्ध्यावर शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे.
.....
राज्यात आठशेच्यावर नर्सिंगचे शिक्षण देणारे कॉलेज आहेत. या कॉलेजमध्ये सुमारे दहा हजारांवर मुली शिक्षण घेतात. हे शिक्षण घेण्यासाठी महामंडळाच्या बसेमधून येतात. अगोदर सवलतीच्या दरात पास दिले जात होते. परंतु, कोणतीही सूचना न देता हे पास देणे बंद केले आहे. यावर अधिकाऱ्यांना विचारणा केली, असता फक्त उडवाउडवीचे उत्तर दिले जाते. त्यामुळे महामंडळाच्या आडमुठेपणामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
- हिरालाल महानुभाव, अध्यक्ष, कोपरगाव तालुका विद्यार्थी सहायक समिती, कोपरगाव..
......
एस. टी. महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून आलेल्या परिपत्रकात सवलतीमध्ये पास देण्यासंदर्भात नर्सिंगचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे हे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात मासिक पास देता येत नाहीत. परंतु, त्यासाठी सध्या तीन महिन्यांचे पास उपलब्ध आहेत.
-दादासाहेब महाजन, विभागीय वाहतूक अधिकारी, एस. टी. महामंडळ, अहमदनगर