प्रस्थापित पक्षांकडून ओबीसी ‘वंचित’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:18 AM2019-04-19T05:18:54+5:302019-04-19T05:20:33+5:30

आरक्षणासाठी आग्रही असलेल्या धनगर समाजाला या वेळी एकाही प्रमुख पक्षाने उमेदवारी दिलेली नाही.

OBCs 'deprived' from established parties | प्रस्थापित पक्षांकडून ओबीसी ‘वंचित’

प्रस्थापित पक्षांकडून ओबीसी ‘वंचित’

- सुधीर लंके 

अहमदनगर : आरक्षणासाठी आग्रही असलेल्या धनगर समाजाला या वेळी एकाही प्रमुख पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. माळी समाजातून केवळ राष्टÑवादीने दोन, तर वंजारी समाजातून भाजपने एक उमेदवार दिला. मुस्लीम समाजालाही केवळ एक प्रतिनिधित्व आहे. मराठा व कुणबी समाजाचे प्रमाण गतवेळेएवढेच आहे. बौद्ध समाजाचा उमेदवारीचा टक्काही घटला आहे.
राज्यातील ३९ मतदारसंघ खुले आहेत. या खुल्या मतदारसंघांत भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी या प्रमुख पक्षांनी दिलेल्या उमेदवारांचा जातनिहाय आढावा घेतला असता अनेक समाज उमेदवारीपासून वंचित असलेले दिसतात. धनगर समाजाचा वरील चार प्रमुख पक्षांनी उमेदवारीसाठी विचार केलेला नाही. २०१४ मध्ये महादेव जानकर हे युतीकडून बारामतीतून लढले होते.
गोपीनाथ मुंडे यांनी या वंजारी समाजाला राजकीय प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले. या समाजाला भाजपने प्रीतम मुंडे यांच्या रूपाने एक जागा दिली. माळी समाजातून राष्टÑवादीने समीर भुजबळ व डॉ. अमोल कोल्हे हे दोन उमेदवार दिले आहेत. २०१४ मध्ये ही संख्या तीन होती.
दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेसने बौद्ध समाजाला संधी दिली आहे. २०१४ मध्येही बौद्ध समाजाचा काँग्रेस व भाजपनेच विचार केला होता. बौद्धेतर दलित समाजात काँग्रेसने तीन, सेनेने तीन, तर भाजपने एक उमेदवार दिला आहे. राष्टÑवादीने अमरावतीत अपक्षाला पाठिंबा दिला आहे. मुुस्लीम समाजाला २०१४ च्या निवडणुकीत प्रमुख चार पक्षांपैकी केवळ काँग्रेसने एक जागा दिली होती. या वेळी तीच स्थिती आहे. आगरी समाजाला प्रमुख पक्षांकडून चार जागांवर संधी मिळाली आहे.
तेली, शेट्टी, कायस्थ, मारवाडी, गुजराती, जैन, खाटिक, लिंगायत, भंडारी या समाजांना प्रत्येकी एका जागेवर संधी मिळाली आहे. गवळी व लेवापाटील समाजाला प्रमुख पक्षांनी प्रत्येकी दोन जागा दिल्या आहेत.
>मराठा समाजाचे उमेदवार वाढले
या निवडणुकीत खुल्या ३९ मतदारसंघांपैकी दोन्ही काँग्रेसने १४ तर सेना-भाजप युतीने २२ मतदारसंघांत मराठा उमेदवार दिलेले दिसतात. याशिवाय कुणबी समाजाला काँग्रेस आघाडीने सहा तर युतीने चार जागांवर संधी दिली आहे. २०१४ च्या तुलनेत मराठा समाजाचे उमेदवार वाढले आहेत. या वेळी १५ मतदारसंघांत मराठा विरुद्ध मराठा तर तीन मतदारसंघांत कुणबी विरुद्ध कुणबी अशी लढत आहे.
>ब्राह्मण समाजाचे सात उमेदवार : ब्राह्मण समाजाला सर्वच प्रमुख पक्षांनी संधी दिली आहे. एकूण सात ब्राह्मण उमेदवार या वेळी रिंगणात आहेत. गतवेळी ही संख्या सहा होती.
>वंचित आघाडीचे सोशल इंजिनीअरिंग
वंचित आघाडीने धनगर समाजाला सात, माळी समाजाला दोन, वंजारी समाजाला एक, मुस्लीम पाच व बौद्ध समाजाला नऊ जागांवर संधी दिली आहे. मराठा, कुणबी, भूमिहार ब्राह्मण या समाजांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली. वडार, कैकाडी, तेली, विश्वकर्मा, धीवर आदी जातींनाही उमेदवारी दिली आहे. सर्व जातींना प्रतिनिधित्वाचे प्रकाश आंबेडकरांचे धोरण आहे, असे आघाडीचे राज्य निमंत्रक किसन चव्हाण यांनी सांगितले.
>बसपाने सर्वच जातीधर्मातून उमेदवार देत राजकीय प्रक्रियेत सामाजिक समतोल राखला आहे.
- सुरेश साखरे,
प्रदेशाध्यक्ष बसपा.
>बौद्ध समाजाची लोकसंख्या मोठी असताना या समाजाचे अस्तित्वच राजकारणात नाकारले जात आहे. रामदास आठवले, कवाडे यांच्या पक्षांना एकही जागा दिलेली नाही. बौद्ध समाजाला गृहीत धरले जाते.
- अशोक गायकवाड, संस्थापक अध्यक्ष, युनायटेड रिपब्लिकन पक्ष.


माळी समाजाला राष्टÑवादी व मित्र पक्षाने उमेदवारी दिली, इतर पक्षांनी नाही. अशी उपेक्षा नको.
- बापूसाहेब भुजबळ, उपाध्यक्ष समता परिषद.
प्रस्थापित पक्षांनी धनगर समाजाला डावलले. वंचित आघाडीने या समाजाला प्रतिनिधित्व दिले.
- डॉ. इंद्रकुमार भिसे
कुठलाच पक्ष वंजारी समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व देत नाही. एखादी जागा दिली म्हणजे पुरे झाले असा विचार पक्षांनी करायला नको.
- अ‍ॅड. भास्करराव आव्हाड, अभ्यासक.
मराठा समाजाला लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधित्व आहे. पण सर्व प्रस्थापित चेहरे आहेत.
- शिवानंद भानुसे, प्रवक्ता संभाजी ब्रिगेड
लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व देणे अपेक्षित होते. मात्र केवळ एक उमेदवारी मिळाली.
- अर्शद शेख, सामाजिक अभ्यासक
ब्राह्मण समाजाचे पाचच उमेदवार आहेत. त्यातही पुण्यात आपसात लढत आहे. - गोविंद कुलकर्णी, राष्टÑीय अध्यक्ष, ब्राह्मण महासंघ.

Web Title: OBCs 'deprived' from established parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.