ध्यान धारणेचा वस्तुपाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 11:55 AM2019-11-24T11:55:29+5:302019-11-24T11:56:00+5:30
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांचे योगदान अतुलनीय आहे. या महाराष्ट्रात संतांच्या अनेक परंपरा निर्माण झाल्या. अनेक संप्रदाय उदयास आले. या संप्रदायाच्या प्रचारार्थ त्या संप्रदायातील अनुयायांनी आणि परंपरेतील संतांनी संप्रदाय तत्त्व लोकमानसात रूजविण्यासाठी काही वाङ्मयनिर्मिती केली.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांचे योगदान अतुलनीय आहे. या महाराष्ट्रात संतांच्या अनेक परंपरा निर्माण झाल्या. अनेक संप्रदाय उदयास आले. या संप्रदायाच्या प्रचारार्थ त्या संप्रदायातील अनुयायांनी आणि परंपरेतील संतांनी संप्रदाय तत्त्व लोकमानसात रूजविण्यासाठी काही वाङ्मयनिर्मिती केली. याबरोबरच संप्रदायातील लोकांना आचारधर्म शिकविण्यासाठी काही मार्गही सांगितले गेले. त्या मार्गाने गेल्यास साधकास ईप्सित साध्य प्राप्त होते. हे कधी सायासाने तर कधी वर्तणुकीतून शिकविले. साधकास अंतिम साध्य प्राप्त करून घेण्यासाठी पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये व मन यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. ते केल्यासच साधकास अंतिम ध्येयाप्रद जाता येते. याविषयी अनेक साधनामार्गांनी आपापल्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
नाना पंथ, नाना मार्ग या मतांच्या गलबल्यात सर्वसामान्य साधक भरकटला जातो. दशेंद्रिय व मन नियंत्रणासाठी काय करावे? योग आचरावा की, संन्यास? असे बरेचसे प्रश्न समाजासमोर उभे राहतात. मात्र संतांचे हेच काम असते की साधकास योग्य दिशा दाखविणे. हेच काम प.पू. सद्गुरू भागवताचार्य अशोकानंद महाराज यांनी केले आहे. आजपर्यंत गुरूवर्य अशोकानंदांची अनेकविध विषयावर ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. साध्या, सरळ, सोप्या व ओघवत्या भाषेत वाचकाशी संवादरूपाने अध्यात्माचे विवेचन बºयाच ग्रंथामधून केलेले दिसते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आपल्या मनावर बराच ताण घेऊन जगत आहे. मन:स्वास्थ्य हरवून बसला आहे. हे स्वास्थ्य मिळविण्यासाठी तो नाना खटपटी करतो पण हे उपाय पुरेसे पडत नाहीत. यासाठीच प.पू. गुरुवर्यांनी ‘मन:शांतीसाठी सुलभ ध्यान धरणा’ या छोटेखानी ग्रंथाचे लेखन केले आहे. या ग्रंथात वाचकांशी संवाद आहे. अष्टांग योगाचा सोेपेपणा त्यांनी या ग्रंथात करून सांगितला आहे. सर्वसामान्यांच्या मनात योगाविषयी काही साशंकता आहे. अष्टांग योगातील यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या प्रमुख टप्प्यांचा सुलभ अर्थ लेखकाने यात सांगितला आहे.
यम म्हणजे नैतिकता होय. यात सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आदी गोष्टींचा अंतर्भाव सांगितला व तो साधक कसा असावा तर सत्यवादी असावा, असे सहजपणे सांगितले आहे. नियम म्हणजे शौच, संतोष तपादी गोष्टींचे सुंदर विवेचन या ग्रंथात केले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधनेसाठी आसन या गोष्टींवर विशेष भर दिला. आसन जय झाला की सर्व साध्य होते ते कसे असावे? याविषयीचे सुंदर चिंतन या ग्रंथात आहे. प्राणायाम, प्राण म्हणजे शक्ती व आयाम म्हणजे नियंत्रण होय. या बाबींचा उल्लेख छान पद्धतीने केला आहे.
प्रत्याहार म्हणजेच इंदियांना इतर विषयाकडून खेचून आत्मविषयात कसे रमविले पाहिजे याचे चिंतन त्यांनी मांडले आहे. धारणा या प्रकाराविषयी चिंतन मांडताना एकाग्रता कशी करायची, चंचलता कशी कमी करायची? सहजासनात बसून धारणा बाह्यविषयापासून चित्त अंतर्मुख कसे करावे याचे विवेक चिंतन या ग्रंथात आहे.
ध्यान ही अष्टांग योगातील महत्त्वाची पायरी होय. ध्यानाने देहतादात्म्य कसे सुटते, नादानुसंधान कसे लागते याचे विवेचन फार सुरेख पद्धतीने आले आहे. यातील शेवटची पायरी म्हणजे समाधी होय. यात सविल्प समाधी, निर्विकल्प समाधी याविषयीचे सूक्ष्म विवेचन लेखकाने केलेले आहे. वरील क्रम व्यवस्थित राखल्यास व आसनजप, श्वासनियंत्रण झाल्यास मनाची एकाग्रता झाल्यास समाधी सहज प्राप्त होऊ शकते याचे सुंदर विवेचन चिंतन या ग्रंथात आहे.
या ग्रंथ केवळ योग्यांसाठीच नाही तर सर्वसामान्य व्यक्तींसाठी देखील आहे. मन:स्वास्थ्य हरवलेल्या व्यक्तीला व साधकाला दिशादर्शक ग्रंथ आहे. या ग्रंथात विविध विषयावर स्पष्टीकरण देतांना वेद, श्रीमद्भागवत, गीता, संतवाङ्मय आदीतील संदर्भ आहेत. साधकाने ध्यान धारणा कशी करावी याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे हा ग्रंथ होय. एकूणच हा ग्रंथ म्हणजे ‘गागर में सागर’ होय असे मला वाटते.
-डॉ. भाऊसाहेब मुळे