शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या उपमहापौरांची भाजपातून हाकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:44 PM2018-02-16T15:44:58+5:302018-02-16T17:35:12+5:30
अहमदनगर महापानगरपालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर जिल्हाभरात पडसाद उमटू लागले आहे. वाढता जनक्षोभ लक्षात घेतल्यानंतर छिंदम यांचा राजीनामा घेण्यात आला असून, त्यांची भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.
अहमदनगर : अहमदनगर महापानगरपालिकेचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर जिल्हाभरात पडसाद उमटू लागले आहे. वाढता जनक्षोभ लक्षात घेतल्यानंतर छिंदम यांचा राजीनामा घेण्यात आला असून, त्यांची भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. छिंदम यांनीही एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून माफी मागितली आहे.
शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना भाजपच्या उपमहापौरांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. मनपा कर्मचा-याला उद्देशून बोलताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. याची आॅडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नगरमध्ये वातावरण तणावपूर्ण बनले असून, छिंदम यांच्या कार्यालयाची शिवसेना, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेडच्या कार्याकर्त्यांनी तोडफोड केली आहे. महापालिकेचे कामकाजही बंद पाडण्यात आले आहे. महापालिकेतील उपमहापौरांच्या कार्यालयाला चपलांचा हार घालण्यात आला. खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना यांनी मोर्चा काढला. शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, जिल्हाभर छिंदम यांच्याविरोधात आंदोलने सुरु आहेत. छिंदम याच्याविरोधात राज्यभर शिवप्रहार संघटनेकडून गुन्हे दाखल करण्यात येतील, असे भोर यांनी सांगितले. वकील संघटनेने छिंदम यांचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव केला आहे.
छिंदम यांच्या माफीनाम्याचा व्हिडिओ