कृषीपंपांमागे ५ हजार रुपये भरण्याचे बंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:21 AM2021-02-16T04:21:25+5:302021-02-16T04:21:25+5:30

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने व अंत्रे उपकेंद्रांतर्गत असलेल्या भावीनिमगाव, दहिगावने, मठाचीवाडी, रांजणी, घेवरी, शहरटाकळी, ढोरसडे-अंत्रे आदी गावांतील कृषी ...

Obligation to pay Rs. 5,000 for agricultural pumps | कृषीपंपांमागे ५ हजार रुपये भरण्याचे बंधन

कृषीपंपांमागे ५ हजार रुपये भरण्याचे बंधन

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने व अंत्रे उपकेंद्रांतर्गत असलेल्या भावीनिमगाव, दहिगावने, मठाचीवाडी, रांजणी, घेवरी, शहरटाकळी, ढोरसडे-अंत्रे आदी गावांतील कृषी पंपांचा वीजपुरवठा सोमवारी (दि.१५) थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी खंडित करण्यात आला होता. हा खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. कृषी पंपामागे पाच हजार रुपये भरावे लागतील, असा निर्णय बैठकीत झाला. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

दहिगावने येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी एकरकमी वीजबिल रक्कम भरण्यास असमर्थता दर्शवत सवलत मिळावी, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, कृषीपंप वीजधोरण २०२० योजनेनुसार वीज बिलात मिळणाऱ्या ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर एकरकमी पैसे भरावेच लागतील, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी सोडली नाही. त्यानंतर दीर्घकाळ चर्चा चालली. शेवटी प्रत्येक कृषीपंपामागे ५ हजार रुपये भरण्याचा निर्णय झाला. त्यानंतर खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी ५ हजार रुपये भरणारे शेतकरी कृषी पंप योजनेतून मिळणाऱ्या ५० टक्के सवलतीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत असे होऊ नये, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

यावेळी भातकुडगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता पीयुष पाडवी, भावीनिमगाव सेवा संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरपंच आबासाहेब काळे, सुभाष पवार, उपसरपंच संतोष चव्हाण, राजाभाऊ पाऊलबुद्धे, कचरू शेळके, लेखनिक अंकित जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ सुनील गुळमकर, विष्णू गुंजाळ, किरण चेडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

---

कृषीपंप वीज धोरण २०२० योजनेनुसार थकीत वीजबिलात ५० टक्के सवलत मिळण्यासाठी ५० टक्के रक्कम भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे शेतकरी ५० टक्के रक्कम भरण्यास तयार आहेत. मात्र प्रतिपंप ५ हजार रूपये भरणारे शेतकरी या योजनेच्या लाभापासून सध्यातरी वंचित राहतील.

पीयूष पाडवी,

सहाय्यक अभियंता, भातकुडगाव कक्ष

---

‘महावितरण’कडून सुरू असलेली थकीत वीज बिलाची वसुली शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीच्या काळात सुरू आहे, असे असले तरी सरासरी असलेल्या वीज बिलात सध्या शेतकऱ्यांनी ५ हजार रुपये जरी भरले तरी शासनाच्या सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळायला हवा.

-संतोष चव्हाण,

उपसरपंच, भावीनिमगाव

Web Title: Obligation to pay Rs. 5,000 for agricultural pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.