बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात रुग्णांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:53 AM2021-01-13T04:53:53+5:302021-01-13T04:53:53+5:30
अहमदनगर : शहरातील बाळासाहेब देशपांडे शासकीय रूग्णालयात गरोदर महिला रुग्णांची सोनोग्राफी करण्यास टाळाटाळ करून अडवणूक केली जाते. त्यामुळे प्रशासनाने ...
अहमदनगर : शहरातील बाळासाहेब देशपांडे शासकीय रूग्णालयात गरोदर महिला रुग्णांची सोनोग्राफी करण्यास टाळाटाळ करून अडवणूक केली जाते. त्यामुळे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष घालून हा कारभार सुधारावा, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या रुग्णालयात गरोदर महिला, तसेच बाळंत महिला रुग्णांची हेळसांड होत असल्याची तक्रार मोबीना इरफान शेख (रा. मुकुंदनगर) यांनी प्रहार संघटनेकडे, तसेच राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे. गरोदर महिला या रुग्णालयात तपासणीसाठी किंवा सोनोग्राफीसाठी गेल्या, तर तेथील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. ही महिला गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात येत आहे, परंतु तिची सोनोग्राफी न करता बाहेरून सोनोग्राफी करण्याचे सांगितले जाते. अनेक महिलांबाबतही हीच तक्रार आहे. येथील कर्मचाऱ्यांनी महिला रुग्णांची अडवणूक न करता सेवेत सुधारणा करावी, अन्यथा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून प्रवक्ते संतोष पवार व प्रहार प्रदेशाध्यक्ष अजय महाराज बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी, जिल्हा सल्लागार मालोजी शिकारे, सचिव प्रकाश बेरड आदींनी दिला आहे. याबाबत संघटनेने मनपाचे आरोग्याधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.