विखेंच्या सभेत जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; संगमनेरमध्ये तणाव; वाहनांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 08:49 IST2024-10-26T08:48:34+5:302024-10-26T08:49:48+5:30
वसंत देशमुखांवर कारवाईची मागणी

विखेंच्या सभेत जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; संगमनेरमध्ये तणाव; वाहनांची तोडफोड
लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर: धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आयोजित केलेल्या युवा संकल्प मेळाव्यात विखे समर्थक असलेले वसंतराव देशमुख यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
विखे यांच्या भाषणापूर्वी देशमुख यांनी हे वक्तव्य केले. सभेनंतर धांदरफळ येथे महिलांनी देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध केला. महिला व्यासपीठावर गेल्या. तेथे महिलांनी ठिय्या मांडला आहे. देशमुख यांना येथे बोलवावे. त्यांच्यावर कारवाई करावी त्याशिवाय आम्ही हटणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला आहे. सरपंच उज्ज्वला देशमाने यांसह अनेक महिला या आंदोलनात सहभागी आहेत.
अकोले नाका परिसरात लावण्यात आलेले विखे यांचे फलक फाडण्यात आले आहेत. विखे समर्थकांच्या काही वाहनांचीही तोडफोड झाली आहे. तालुका पोलीस स्टेशनला डॉ. सुधीर तांबे, जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे, इंद्रजित थोरात, अमर कतारी, सीताराम राऊत आदींसह रात्री उशिरा मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. सुजय विखे, वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात तणाव निर्माण झाला आहे.