साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:28 IST2025-04-21T15:27:50+5:302025-04-21T15:28:19+5:30
या महिलेने हैदराबादमध्ये ७५ लाखांचा सोनेरी मुकुट साकारला. या मुकुटाचे डिझाइनही याच महिलेनेच काढले.

साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
Shirdi Sai Baba: एका कुटुंबाने साईबाबांना तब्बल ७५ लाख रुपयांचा (७८८. ४४ ग्रॅम) सुवर्ण मुकुट अर्पण केला. शनिवारी रात्री या भाविक दाम्पत्याने मुकुट अर्पण करत आपली संकल्पपूर्ती केली. आंध्र प्रदेशातील भाविक कुटुंब दोन वर्षापूर्वी दर्शनासाठी शिर्डीत आले होते. यावेळी यातील गृहिणी असलेल्या महिलेने साईबाबांच्या समाधीसमोर संकल्प केला होता. 'मी पुढच्या वेळी सुवर्ण मुकुट घेऊनच तुमच्या दर्शनाला येईन.' असा तो संकल्प होता. जाताना त्या महिलेने मुकुटाचे वजन आणि मापही घेतले होते. त्यावेळी महिला इंग्लंडला नोकरीला होती. असे असले तरी परिस्थिती बेताची होती, मात्र स्वप्न मोठे होते, असे या महिलेने माध्यमांना सांगितले.
या महिलेने हैदराबादमध्ये ७५ लाखांचा सोनेरी मुकुट साकारला. या मुकुटाचे डिझाइनही याच महिलेनेच काढले. शनिवारी रात्री जेव्हा हा मुकुट साईच्या मूर्तीवर चढवला जात होता, तेव्हा त्या भाविक दाम्पत्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहात होते. साई सस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या भावूक क्षणाचे साक्षीदार होत या कुटुंबाचा सत्कार केला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर प्रमुख विष्णूपंत थोरात, सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते.
ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
दाम्पत्याने आपली ओळख गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे. ही कथा केवळ एका मुकुटाची नाही, तर एका अतूट श्रद्धेची, एका महिलेच्या निश्चयाची आणि साईबाबांच्या अगाध कृपेची आहे, असे त्या भाविक असलेल्या महिलेने सांगितले.