पदाधिकारी निवडीचे वारे
By Admin | Published: September 5, 2014 11:36 PM2014-09-05T23:36:16+5:302023-06-09T13:18:44+5:30
अहमदनगर: जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला़
अहमदनगर: जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला़ जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीसाठी सभा घेण्याची नोटीस जिल्हा परिषदेला बजावली असून, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची २१ ला तर पंचायत समिती सभापती व उपसभापतींची १४ सप्टेंबर रोजी निवड होणार आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेत ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पदाधिकारी निवडीचे वारे वाहू लागले आहेत़
जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व उपाध्यक्ष मोनिका राजळे यांचा कार्यकाल येत्या २१ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे़ त्यामुळे पुढील अडीच वर्षांसाठी नव्याने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे़ या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कवडे यांनी जाहीर केला आहे़ त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्षांसह उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांच्या निवडी करण्यात येणार असून, निवडणुकीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत़ विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर हा कार्यक्रम जाहीर झाला़ त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले असून, विधानसभा निवडणुकीची समीकरणे यामुळे बदलण्याची शक्यता आहे़ तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या पंचायत समिती सभापतींचीच निवडणूक होत आहे़ त्यामुळे तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार आहे़
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सभा घेण्यात येईल़ पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कवडे सभेला असणार आहेत़ जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही पदांसाठी सभागृहात निवडणूक होईल़ अर्ज दाखलसाठी सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत मुदत असणार आहे़ दुपारी तीन वाजता होणाऱ्या सभेत प्राप्त अर्जाची छाननी करून माघारी घेण्यासाठी मुदत दिली जाईल़ अर्जांची छाननी व माघारीचा कालावधी संपल्यानंतर आवश्यकता भासल्यास निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे़ पंचायत समिती सभापती पदासाठी १४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सर्व पंचायत समिती सभागृहात सभा घेण्यात येणार आहे़ सर्व पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतींसाठी एकाच दिवशी निवडणूक होत आहे़ पिठासीन अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली असून, तसे पत्र पंचायत समित्यांना देण्यात आले आहेत़ अर्ज दाखलसाठी सकाळी ११ ते १ पर्यंत मुदत राहिल़ अर्जाची छाननी करून आवश्यकता भासल्यास सभापती व उपसभापतींसाठी निवडणूक घेतली जाणार आहे़ (प्रतिनिधी)