श्रीरामपूरला नगररचना सहायक संचालक कार्यालय मंजूर
By शिवाजी पवार | Published: February 21, 2024 06:31 PM2024-02-21T18:31:57+5:302024-02-21T18:32:26+5:30
नगर जिल्ह्याची सात तालुके जोडली : सुधारित आकृतीबंध मंजूर, नगर विकासचे आदेश
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर येथील लवाद नगररचना योजना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नगररचना शाखा असे नामकरण करण्यात आले आहे. त्यासाठी पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने मंगळवारी त्यासंबंधीचे आदेश पारित करत उत्तर नगर जिल्ह्याची सर्व तालुके त्यास जोडली आहेत. काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी यासाठी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
सहाय्यक संचालक नगररचना कार्यालयास श्रीरामपूरसह संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी, नेवासा व अकोले हे तालुके अंतराने जवळ असल्याने जोडण्यात आले आहेत. या सर्व तालुक्यातील नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती तसेच महसूल विभागाकडील नगररचना विषयक कामकाज श्रीरामपुरातील सहाय्यक संचालक कार्यालयाकडून करता येणार आहेत. त्यास नगर विकास विभागाने मंगळवारी मान्यता दिली.
श्रीरामपूर येथे लवाद कार्यालया ऐवजी सहाय्यक संचालक नगररचना कार्यालयाची नव्याने निर्मिती करण्यात आली होती. मंगळवारच्या आदेशाने कार्यालयाचे कार्यक्षेत्र निश्चित करुन येथे नवीन पदांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्याच्या भागातील नागरिकांची घरांच्या बांधकाम परवानगी व बिगर शेतीच्या कामांसाठी नगर येथे जाण्याची आता आवश्यकता राहणार नाही.
नगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून येथे १४ तालुक्यांचा समावेश आहे. नगररचना विभागाचे जिल्हास्तरीय कार्यालय केवळ नगर येथे मुख्यालयी कार्यरत होते. त्यामुळे उत्तरेतील सात तालुक्यांच्या नागरिकांची मोठी गैरसोय होती. ग्रामीण भागातील नागरिकांना बांधकाम विषयक कामासाठी नगर येथे जावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत होती.