अर्सेनिकवर पदाधिकाऱ्यांची चुप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:53 AM2021-01-13T04:53:34+5:302021-01-13T04:53:34+5:30

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे पाणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येऊनही यावर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ...

Officials' silence on arsenic | अर्सेनिकवर पदाधिकाऱ्यांची चुप्पी

अर्सेनिकवर पदाधिकाऱ्यांची चुप्पी

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे पाणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येऊनही यावर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अद्याप चुप्पीच साधलेली आहे. प्रशासनानेही तपासाच्या नावाखाली केवळ संबंधितांना गोळ्यांची पाकिटे बदलून दिली, मात्र निकृष्ट गोळ्यांचे पुढे काय झाले, याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची प्रतिकारशक्ती वाढावी, म्हणून प्रत्येकाला अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपाच्या सूचना शासनाने दिल्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने तब्बल सहा महिने उशिराने म्हणजे डिसेंबर २०२० मध्ये या गोळ्या एजन्सी नेमून वाटपास सुरुवात केली. जिल्ह्यातील ३८ लाख ४२ हजार लोकांना या एजन्सीमार्फत गोळ्यांचा पुरवठा पंचायतसमिती स्तरावर करण्यात आला.

दरम्यान, मागील आठवड्यात शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे या गोळ्यांमध्ये पाणी आढळले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. प्रशासनाने तातडीने या गोळ्या ताब्यात घेण्यासाठी धावपळ केली. तसेच संबंधित ग्रामपंचायतीला दुसऱ्या गोळ्या बदलून दिल्या. दरम्यान, अशा निकृष्ट गोळ्यांचा पुरवठा करून जिल्हा परिषद सामान्य लोकांच्या जीवाशी खेळत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त झाल्या.

एवढा सगळा प्रकार होऊनही यावर जिल्हा परिषद पदाधिकारी मात्र गप्प आहेत. हा प्रकार कसा झाला, गोळ्यांचे पाणी झाले तर यात दोषी कोण? यात खरंच ठेकेदाराकडून निकृष्ट पुरवठा झालाय की, अन्य काही वैद्यकीय कारण आहे, यावर अद्याप कोणत्याही पदाधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रशासनाकडेही या प्रकारावरील पुढील कारवाईबाबत विचारणा केली असता, संबंधित गोळ्यांचे नमुने ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे, एवढेच उत्तर मिळाले. त्यामुळे या सर्व प्रकारावर गोलमाल कारभार सुरू असल्याचे दिसत आहे.

Web Title: Officials' silence on arsenic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.