वीज चोरीचे तंत्र पाहून अधिकारीही थक्क; ४० जणांना ठोठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 06:31 PM2020-02-12T18:31:22+5:302020-02-12T18:32:17+5:30
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांच्या वीज चोरीचे तंत्र पाहून महावितरणचे अधिकारी, कर्मचारीही थक्क झाले.
कोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांच्या वीज चोरीचे तंत्र पाहून महावितरणचे अधिकारी, कर्मचारीही थक्क झाले.
पाथर्डी शहरातील मोहिमेनंतर ग्रामीण भागातील वीज चोरी रोखण्याकडे महावितरणने लक्ष केंद्रीत केले आहे. मंगळवारी सकाळी कोरडगाव परिसरात वीज चोरी विरोधात कारवाई करण्यात आली. कोरडगाव, तोंडोळी, औरंगपूर, जिरेवाडी, दैत्यनांदूर, अकोला, खरवंडी, ढाकणवाडी येथे ही मोहीम राबविण्यात आली. शेतक-यांसह ग्रामीण भागातील घराघरातील वीजचोरीचे तंत्र पाहून अधिकारी, कर्मचारीही थक्क झाले. हिटर, शेगड्या, मीटर व्यतिरिक्त आकडे, मीटर बायपास करणे, जमिनीमध्ये वायर पुरुन घेणे, मंजुरीहीपेक्षा वीजेचा जास्त वापर, गावठाण वाहिनीवर अनधिकृत कनेक्शन घेणे असे प्रकार यावेळी आढळून आले.
तब्बल ४० ठिकाणी वीज चोरी आढळून आली. या सर्वांना दंड ठोठाविण्यात आला आहे. दंड न भरल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, असे अधिका-यांनी सांगितले.
मोहिमेमध्ये सहायक अभियंता प्रिया मुंढे, हरिश्चंद्र पोपळघट, लाईनमन वैभव केरे, अर्जुन बडे, शिवनाथ शेकडे, आदिनाथ चौधरी, प्रवीण घोरपडे, गणेश फुंदे, दत्तू ढोले, विकास सातपुते, भाऊसाहेब पाटील, विकास सचिन साबळे, अर्जुन खेडकर, घनशाम खेडकर, बबीता पवार यांच्यासह २५ जनमित्र कर्मचारी सहभागी झाले होते.