कामांमध्ये हलगर्जीपणा झाल्यास आधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल -राधाकृष्ण विखे पाटील
By शेखर पानसरे | Updated: April 27, 2023 16:19 IST2023-04-27T16:19:14+5:302023-04-27T16:19:31+5:30
"आता सरकार बदलले आहे", मंत्रीमहोदयांचे सूचक विधान

कामांमध्ये हलगर्जीपणा झाल्यास आधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल -राधाकृष्ण विखे पाटील
शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर: सरकारी योजनेतील कामांमध्ये कोणताही हलगर्जीपणा झाल्यास येथून पुढे आधिका-यांना जबाबदार धरण्यात येईल. ठेकेदारांच्या भरवश्यावर कोणत्याही योजनेची कार्यवाही करु नका, आता सरकार बदलले आहे. याची जाणीव ठेवून तलाठी आणि ग्रामसेवकांनी सामान्य माणसाच्या हिताचा कारभार करावा. उगाच ठेकेदारांची चिंता करीत बसू नका. अशा शब्दात महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा बैठकीत खडेबोल सुनावले.
गुरुवारी (दि. २७) संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय आढावा बैठकीचे आयोजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. वडगावपान आणि समनापुर या जिल्हा परिषद गटांची बैठक तळेगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मंत्री विखे पाटील यांनी गावनिहाय समस्यांचा आढावा घेवून या कार्यवाही करण्याच्या सुचना विविध विभागांच्या आधिका-यांना दिल्या. याप्रसंगी प्रांताधिकारी शशिकांत मगंरुळे, गटविकास आधिकारी नागणे यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे आधिकारी उपस्थित होते.