अहमदनगर जिल्ह्यात कडकडीत बंद : बससेवा ठप्प, शाळा-कॉलेजांना सुट्टी, थोड्याच वेळात रोखणार महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 09:43 AM2018-07-25T09:43:22+5:302018-07-25T09:43:45+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली असून सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
अहमदनगर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली असून सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
जिल्ह्यातील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. एस.टी महामंडळाने खबरदारी घेत जिल्ह्यातील बससेवा पूर्णपणे बंद ठेवली आहे. याशिवाय जिल्ह्यातील शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे. अहमदनगर शहरातील रिक्षाही बंद ठेवण्यात आल्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातही कडकडीत बंद पाळण्यात येत असून जनजीवन पूर्णत विस्कळीत झाले आहे. अनेक गावांत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत बंद पाळण्यात आला.
थोड्याच वेळात जिल्ह्यातील प्रमुख महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणा-या काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करून सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार आहे. अहमदनगर- मनमाड मार्गावर विळद घाट येथे, कल्याण - विशाखापट्टणम रोडवर कल्याण बायपासवर, औरंगाबाद- पुणे मार्गावरील केडगाव बायपासवर, अहमदनगर - दौंड मार्गावर अरणगाव येथे, अहमदनगर - सोलापूर मार्गावर वाळुंज बायपासवर, पाथर्डी रोडवर विजय लाईन येथे, औरंगाबाद मार्गावर शेंडी बायपासवर, बीड रोडवर निंबोडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.