डाळिंबावर तेल्या रोग, शेतकऱ्यांनी नष्ट केल्या बागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:41+5:302021-07-07T04:26:41+5:30
संगमनेर तालुक्यातील पठारभागात अनेक ठिकाणी डाळिंब बागांवर तेल्या व मर रोग आल्याने शेतकऱ्यांनी बागा तोडायला सुरुवात केली आहे. सध्या ...
संगमनेर तालुक्यातील पठारभागात अनेक ठिकाणी डाळिंब बागांवर तेल्या व मर रोग आल्याने शेतकऱ्यांनी बागा तोडायला सुरुवात केली आहे. सध्या तालुक्यात अधून-मधून पडणारा पाऊस, मध्येच पडणारे कडक ऊन यामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अतिवृष्टीनंतर झालेल्या फुल गळतीमुळे शेतकऱ्यानी कसातरी मोठा खर्च करून, विविध औषधे वापरून डाळिंबाची सेटिंग झाले. परंतु सध्या हवामानातील बदलामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना तेल्याग्रस्त डाळिंब तोडून ती फेकून द्यावी लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी गेली वर्ष दोन वर्षे विविध संकटांशी सामना करीत मोठा खर्च करून आलेल्या बागाही तेल्याने जात आहेत. डाळिंबासाठी बहार धरण्यासाठी केलेल्या आजवरचा खर्च, खते-औषधे यांची दुकानदारांची देणी व वर्षभरासाठी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा. आता जगायचे तरी कशावर..? या आर्थिक प्रश्नांमुळे डाळिंब उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान, तेल्या व मर रोगावर शाश्वत औषधे नसल्याने व इतर औषधांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याने संगमनेर तालुक्यातील पठारभागातील आंबीखालसा, घारगाव, कोठे, अकलापूर, बोटा, नांदूर आदी गावांच्या परिसरात तेल्या व मर रोगाने अनेक बागा शेतकऱ्यांनी काढल्या असल्याचे कृषी विषयक सल्लागार रमेश कदम यांनी सांगितले.
....................
तेल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी यावरील विविध कंपनीची औषधे बाजारात येत आहेत. विविध औषधांचा प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. विविध उपाय सुचविले जातात. शेतकरी प्रयोग करीत असतो. परंतु या रोगांना समूळ नष्ट करण्यासाठी औषध मात्र अद्यापही मिळाले नाही. औषधांच्या खर्चामुळे वैतागून माझी अडीच एकरवरील डाळिंबाची बाग काढून टाकली आहे.
- महेंद्र गगे, शेतकरी, आंबी खालसा, संगमनेर
.......................................
अनेक वर्षांपासून डाळिंब बागेत काम करून आम्हांला रोजगार मिळतो आहे. आज याच डाळिंब बागांवर तेल्या व मर रोगामुळे कुऱ्हाड चालविण्याची वेळ आली आहे. याच्यासारखे मोठे दुःख नाही.
- बाळासाहेब जाधव, शेत मजूर