उपोषणाचा तिसरा दिवस, आमदार निलेश लंके यांचे दोन किलो वजन घटले, आंदोलनस्थळी राज्यभरातून ओघ
By साहेबराव नरसाळे | Published: December 9, 2022 04:39 PM2022-12-09T16:39:43+5:302022-12-09T16:41:37+5:30
Nilesh Lanke: राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांचे दोन किलो वजन घटले रक्तदाबही कमी झाला आहे.
अहमदनगर - राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांचे दोन किलो वजन घटले रक्तदाबही कमी झाला आहे. मात्र अद्याप शासनाकडून कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हाभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जिल्ह्यात जाळपोळ, रास्तारोकोच्या घटना घडल्या आहेत. लोकप्रतिनिधीची दाखल घेतली जात नसेल तर सर्वसामान्य माणसाचं काय असा प्रश्न लंके यांनी उपस्थित केला आहे.
निलेश लंके म्हणाले, काल अधिकारी आले होते. मात्र त्यांनी काम पूर्ण झाल्याचे खोटे सांगितले आहे. ७ वर्ष झाले तरी 52 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्यावरील एकही पुलाचे काम पूर्ण झालेलं नाही. ४६७ लोकांचा या नादुरुस्त रस्त्याने बळी घेतला आहे. तरी प्रशासनाला जाग येत नाही.
दरम्यान आमदार निलेश लंके यांच्या मातोश्री उपोषणस्थळी दाखल झाल्या होत्या.
लंके यांच्या उपोषणाची सरकारकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे आज जिल्हाभरात विविध आंदोलने करण्यात आली. नगर, पारनेर, पाथर्डी तालुक्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील खुर्च्या जाळण्यात आल्या.
आंदोलनस्थळी राज्यभरातून ओघ
मुंबई, सोलापूर, पुणे, औरंगाबाद अश्या विविध ठिकाणांहून कार्यकर्ते आंदोलनस्थळी येत आहेत.