मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:22 AM2021-07-31T04:22:04+5:302021-07-31T04:22:04+5:30
संगमनेर : ‘गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे बस’ हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ग्रामीण भागात ...
संगमनेर : ‘गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे बस’ हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ग्रामीण भागात सेवेला सुरुवात केली. मात्र, सर्वसामान्यांसाठी धावणारी महामंडळाची लालपरी ग्रामीण मार्गावरून दूर होताना दिसते आहे. लालपरीच्या ग्रामीण भागातील फेऱ्या अद्यापही सुरू झालेल्या नसलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे.
प्रवासाची अनेक साधने असूनही महामंडळाच्या लालपरीला आजही पूर्वीसारखेच महत्त्व आहे. ग्रामस्थांना, ग्रामीण भागातून शहरातील शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना लालपरी हक्काची वाटते. अकोले, संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागाबरोबरच सिन्नर (जिल्हा- नाशिक), आळेफाटा (जिल्हा- पुणे) येथूनही संगमनेर शहरात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या-येणाऱ्या बसला नेहमीच गर्दी असायची. मात्र, कोरोना संसर्गामुळे साधारण दीड वर्षांपासून ग्रामीण भागातील फेऱ्या बंद आहेत. लांब आणि मध्यम लांब पल्ल्याच्या बसेस सुरू झाल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात फेऱ्या बंद असून मुक्कामी जाणाऱ्या बसेस सध्या जात नाहीत.
एखाद्या गावात मुक्कामी गेलेली बस सकाळीच त्या गावातून निघायची. त्या बसने विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी शहरात यायचे. ग्रामस्थांना देखील तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी हे सोईचे असायचे. काम आटोपून पुन्हा गावाकडे जाणाऱ्या बसने विद्यार्थी, ग्रामस्थ गावी जायचे. शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये बंद असल्याने प्रवासी मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील बसेसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.
संगमनेर आगारातून कोळवाडे, सावरगाव घुले, टाहकारी, डिग्रस, आश्वी, हिवरगाव आंबरे, पारेगाव, देवकौठे, साकूर यासह काही गावांमध्ये बसेस मुक्कामी जायच्या. कोरोना संसर्गामुळे प्रवासी संख्या कमी झाली आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी काही कामानिमित्त येण्यासाठी ग्रामस्थांना खासगी प्रवासी वाहनाने अथवा दुचाकीहून यावे लागते आहे. इंधनाचे दर वाढल्याने जाण्या-येण्यासाठी अधिक पैसे खर्च होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
-------------
त्यानंतर फेऱ्या नेहमीप्रमाणे सुरू होतील
संगमनेर आगारात एकूण ५३ बसेस आहेत. त्यापैकी दोन शिवशाही तर दोन सेमी लक्झरी बसेस आहेत. संगमनेर आगाराच्या ग्रामीण भागातील आणि शालेय फेऱ्या सध्या बंद आहेत. शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये नियमित सुरू झाल्यानंतर या फेऱ्या नेहमीप्रमाणे सुरू होतील, असे आगारप्रमुख नीलेश करंजकर यांनी सांगितले.
-----------
कोरोना संसर्गामुळे ग्रामीण भागात बसेसच्या फेऱ्या बंद केल्याची माहिती मिळाली. मुक्कामी येणारी बस आता येत नाही. त्यामुळे शहरात कामासाठी जाणाऱ्या कामगारांचे हाल होतात. किरकोळ शेतमाल घेऊन शेतकरी तो विकण्यासाठी पूर्वी बसने शहरात जायचे. मात्र, बसची फेरी बंद असल्याने खासगी वाहनाने प्रवास करणे परवडत नाही.
- दिनकर भाऊ घुले, सावरगाव घुले, ता. संगमनेर
-----------
संगमनेर आगाराचे प्रमुख नीलेश करंजकर यांना ग्रामीण भागात बसेस व मुक्कामी बसेस सुरू करण्यासाठी साधारण महिन्याभरापूर्वी अर्ज दिला आहे. ग्रामीण भागातील फेऱ्या बंद असल्याने ग्रामस्थांचे, छोट्या व्यापाऱ्यांचे खूप हाल होत आहेत. ग्रामीण भागातील बसेसच्या फेऱ्या लवकरच सुरू कराव्यात, अशी अनेकांची मागणी आहे.
-वैभव भंडारी, आश्वी, ता. संगमनेर