"जत्रा शासकीय योजनांची” अभियानातून दीड लाख लोकांना थेट लाभ : जिल्हाधिकारी
By साहेबराव नरसाळे | Published: May 3, 2023 04:30 PM2023-05-03T16:30:54+5:302023-05-03T16:31:14+5:30
अभियानाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे.
साहेबराव नरसाळे
अहमदनगर : शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी "जत्रा शासकीय योजनांची -सर्व सामान्यांच्या विकासाची” हे अभियान १५ एप्रिल ते १५ जून 2023 या कालावधीत राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानातून जिल्हयातील दीड लाख लोकांना थेट लाभ देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले.
"जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची” या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या. सालीमठ म्हणाले, नियोजन विभागामध्ये शासन निर्णयान्वये "जत्रा शासकीय योजनांची - सर्व सामान्यांच्या विकासाची” असे हे अभियान सर्व जिल्ह्यात एकाच कालावधीत राबविण्यात येत असून त्याचे समन्वयन मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. अभियानाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे.
या अभियानात नागरिकांना, शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. या कालावधीत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येतील. आपला जिल्हा मोठा असल्यामुळे सुमारे दिड लाख लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट या अभियानातंर्गत जिल्ह्याने ठेवले आहे, असे ते म्हणाले.