नगर तालुक्यात १५ दिवसांतच दीड हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:19 AM2021-04-17T04:19:21+5:302021-04-17T04:19:21+5:30

केडगाव : नगर तालुक्यात एप्रिल महिन्यातील १५ दिवसांतच कोरोनाचे दीड हजार रुग्ण झाले असून, सध्या ६२९ सक्रिय रुग्ण आहेत. ...

One and a half thousand patients in 15 days in Nagar taluka | नगर तालुक्यात १५ दिवसांतच दीड हजार रुग्ण

नगर तालुक्यात १५ दिवसांतच दीड हजार रुग्ण

केडगाव : नगर तालुक्यात एप्रिल महिन्यातील १५ दिवसांतच कोरोनाचे दीड हजार रुग्ण झाले असून, सध्या ६२९ सक्रिय रुग्ण आहेत. तालुक्यातील आतापर्यंतची रुग्णसंख्या सहा हजारांच्या पुढे गेली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरीही नगर तालुक्यातील १६ गावांनी कोरोनाला गावात ‘नो एन्ट्री’ आहे.

मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून नगर तालुक्यातील १०६ गावांपैकी १०५ गावात कमी-अधिक संख्येने कोरोनाने शिरकाव केला आहे. एकमेव पांगरमल गावात अद्यापपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. तालुक्यात सध्या ६२९ सक्रिय रुग्ण आहेत. चिंतेची बाब म्हणजे ही संख्या दिवसागणिक वाढत असल्याने तालुक्यात कोरोनाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. नगर तालुक्यात आतांपर्यंत ६ हजार ४५ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, यातील १२२ जणांना आपला जीव यात गमवावा लागला आहे. आतापर्यंत ५ हजार १०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

नगर तालुक्यातील १०६ पैकी तब्बल ५८ गावांत मात्र कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नसून सध्या एप्रिल महिन्यापासून तालुक्यातील १६ गावांत एकही ॲक्टिव रुग्ण नसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

तालुक्यात नागरदेवळे गावात सर्वाधिक ४२४ रुग्णसंख्या झाली असून, बुऱ्हाणनगर व नवनागापूर गावात प्रत्येकी आठ जणांचा बळी गेला आहे. तालुक्यातील देहेरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात आतापर्यंत सर्वाधिक ९०१ रुग्णसंख्या व सर्वाधिक २३ मृत्यूसंख्या झाली आहे. नगर तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे. ४५ वर्षांपुढील १२ हजार जणांचे आतापर्यंत लसीकरण झाले आहे. लसीकरणासाठी केंद्राबाहेर गर्दी होत आहे.

..........

सात गावात रुग्णसंख्या शून्य

या १६ गावांत सक्रिय रुग्णांची संख्या शून्य

नगर तालुक्यात एक आठवड्यापूर्वी ३९ गावांत सक्रिय रुग्णांची संख्या शून्य होती. मात्र सात दिवसांच्या अवधीनंतर आता फक्त १६ गावेच अशी उरली आहेत की जेथे सध्या एकही सक्रिय रुग्ण नाही. खांडके, रांजणी, बाळेवाडी, जांब, पांगरमल, भोयरे खुर्द, मदडगाव, हिवरेझरे, बाबुर्डी बेंद, गवळीवाडा, पिंप्री घुमट, नांदगाव, आंबिलवाडी, पारगावमौला, हमीदपूर, इसळक या गावात सध्या एकही रूग्ण सक्रिय नसल्याने ही गावे कोरोगावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत.

............

आठवडाभरातच वाढते एक हजार रुग्ण

नगर तालुक्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ४ हजार ८३६ इतकी रुग्ण संख्या होती. दुसऱ्या आठवड्यापर्यंत ती ६ हजार ४५ इतकी झाली असून, यात १ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली आहे. मृत्यूची संख्या मात्र ‘जैसे थे’ आहे.

...............

तालुका प्रशासन सतर्क

नगर तालुक्यात जेऊर, बुऱ्हाणनगर, अरणगाव, निबंळक, चिंचोडी पाटील या ठिकाणी ४५० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच

तालुक्यातील प्रत्येक गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली तलाठी, ग्रामसेवक व आशासेविका यांच्या समावेशात ग्रामसमितीची स्थापना करण्यात आलेली आहे. ग्रामसमितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ३६ पर्यवेक्षक नेमलेले आहेत. त्या सर्वांवर नियंत्रण अधिकारी म्हणून नायब तहसीलदार अभिजीत बारवकर काम पाहत आहेत. कन्टेनमेंट झोनचे व्यवस्थापन व ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचे पर्यवेक्षण गटविकास अधिकारी सचिन घाडगे करत आहेत.

कोविड सेंटर सुरू असलेल्या ठिकाणच्या संपूर्ण व्यवस्थेची पाहणी उमेश पाटील प्रत्यक्ष भेटीद्वारे करत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे तसेच आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत.

Web Title: One and a half thousand patients in 15 days in Nagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.