जवळा येथील डॉक्टरच्या खूनप्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 04:35 PM2018-03-30T16:35:25+5:302018-03-30T16:36:00+5:30
स्वस्तातील सोने घेण्यासाठी तालुक्यातील जवळा येथे आलेल्या दोन डॉक्टरला (मूळव्याध) चार चोरट्यांनी बनावट सोने दिले. यावरून त्यांच्यात बाचाबाची होऊन झटापट झाली. यावेळी त्यामध्ये एक डॉक्टरचा जागीच मृत्यू पावला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता.
जामखेड : स्वस्तातील सोने घेण्यासाठी तालुक्यातील जवळा येथे आलेल्या दोन डॉक्टरला (मूळव्याध) चार चोरट्यांनी बनावट सोने दिले. यावरून त्यांच्यात बाचाबाची होऊन झटापट झाली. यावेळी त्यामध्ये एक डॉक्टरचा जागीच मृत्यू पावला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. या हत्या प्रकरणातील चार पैकी एकाच्या मुसक्या आवळण्यात जामखेड पोलिसांना यश आले. न्यायालयाने या आरोपीस पाच दिवसांची कोठडी दिली आहे.
डॉ श्रीकृष्ण जोगेश हालदार व मनोरंजन जोगेश हालदार (रा. भंडारवाडी ता. जि. उस्मानाबाद) हे दोघे मूळव्याध डॉक्टर आहेत. यातील श्रीकृष्ण याचा चोरट्यांनी २७ मार्च रोजी स्वस्तात सोन्याच्या अमिषाने खून केला होता. तर त्याचा भाऊ मनोरंजन चोरट्यांच्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी जखमी मनोरंजन हालदार यांच्या मोबाईलवरील आलेल्या क्रमांकावरील नंबरची पडताळणी करून आरोपीचा शोध घेतला. गुरुवारी सकाळी नऊ वाजता एका गुप्त खबऱ्याकडून या हत्यातील आरोपी टाकळी (ता.करमाळा) येथे उजनी बॅकवॉटर परिसरात निर्जन ठिकाणी पत्र्याचे शेड असलेल्या ठिकाणी आरोपी बेळ्या टकाºया काळे असल्याची खबर मिळाली. यावरून प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पगार, उपनिरीक्षक नामदेव सहारे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा केकाण, बापू गव्हाणे, पि. सी. लोखंडे, श्यामसुंदर जाधव, गणेश साने, अमिन शेख, बाजीराव सानप, मोबाईल सेल पोलीस आर्केल व महिला पोलीस कर्मचारी राणी व्यवहारे आदींनी सदर घटनास्थळी जाऊन पत्र्याच्या शेडला जाऊन गराडा घातला. तेथे आरोपी बेळ्या काळे इतर तीन पुरुष व काही महिला हे गप्पा मारताना आढळून आले. पोलिसांना पाहताच इतर तीन पुरुष पळून गेले. यातील काही महिलांनी व आरोपींनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव सानप किरकोळ जखमी झाले. अखेर पोलिसांनी आरोपी बेळ्या काळे याच्या मुसक्या आवळल्या व अटक केली. एका महिलेसह इतर दोन आरोपींच्या शोधात पोलीस आहेत. पोलिसांनी आरोपी बेळ्या काळे यास शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.