अबब! एका महिन्यात दीड कोटी क्विंटल साखर तयार; साखरेच्या उता-यात नगर पिछाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 07:28 PM2017-12-04T19:28:16+5:302017-12-04T19:30:56+5:30
सन २०१७-१८ चा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन १ महिना पूर्ण झाला आहे. या महिनाभरात साखर आयुक्तांलयांतर्गत कोल्हापूर विभागाने सरासरी १०.३४ टक्के साखर उतारा मिळवित आपली आघाडी कायम राखली आहे. पहिल्या पंधरवड्यात तिस-या क्रमांकांवर असलेल्या अहमदनगर विभागाची चौथ्या क्रमांकांवर घसरगुंडी झाली आहे.
मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर : सन २०१७-१८ चा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन १ महिना पूर्ण झाला आहे. या महिनाभरात साखर आयुक्तांलयांतर्गत कोल्हापूर विभागाने सरासरी १०.३४ टक्के साखर उतारा मिळवित आपली आघाडी कायम राखली आहे. पहिल्या पंधरवड्यात तिस-या क्रमांकांवर असलेल्या अहमदनगर विभागाची चौथ्या क्रमांकांवर घसरगुंडी झाली आहे. साखर उता-यावरूनच उसाचा भाव ठरत असल्याने या उता-याला ऊसउत्पादकांच्या दृष्टीने महत्त्व आहे.
१ नोव्हेंबरला यंदाचा साखर हंगाम सुरू झाला. १ डिसेंबरअखेर राज्यात ९४ सहकारी व ७७ खासगी अशा १७१ साखर कारखान्यांमधून उसाचे गाळप सुरू झाले आहे. महिनाभरात राज्यात १ कोटी ६६ लाख ५५ हजार मेट्रिक टन ऊस गाळपातून १ कोटी ५४ लाख ९९ हजार क्विंटल साखर तयार झाली आहे.
पुणे विभागात सर्वाधिक ५८ कारखाने सुरू झाले आहेत. कोल्हापूरमध्ये ३७, नांदेडमध्ये २८, तर अहमदनगरमध्ये २३ कारखाने सुरू आहेत. राहुरीच्या तनपुरे कारखान्याचा बॉयलर पेटला असला, तरी त्याचे गाळप अजून सुरू झालेले नाही. अहमदनगर जिल्ह्यात साईकृपा-१ हा १०.३२ टक्के उता-यासह पहिल्या क्रमांकावर, अंबालिका (इंडेकॉन) हा खासगी कारखाना ९.९१ टक्के उता-यासह दुस-या क्रमांकांवर आहे. श्रीगोंदा कारखाना ९.८३ टक्के उता-यासह तिस-या, प्रवरानगरचा पद्मश्री विखे कारखाना व कुकडी कारखाना ९.३७ टक्के उता-यासह चौथ्या, तर संगमनेरचा थोरात कारखाना ९.२५ टक्के उता-यासह जिल्ह्यात पाचव्या क्रमांकांवर आहे.
राज्यातील विभागनिहाय साखर उतारा
कोल्हापूर १०.३४ टक्के, पुणे ९.५५, अमरावती ८.९५, अहमदनगर ८.८५, नांदेड ८.४८,औरंगाबाद ७.५६, नागपूर ६.१६.
विभागनिहाय गाळप व साखर उत्पादन
कोल्हापूर ३८.५५ लाख मे. टन ऊस गाळपातून ३९.८५ लाख क्विंटल साखर उत्पादन, पुणे ६६.१० मे. टन गाळप, ६३.११ लाख क्विंटल साखर उत्पादन, अहमदनगर २४.५६ लाख मे. टन गाळप, २१.७४ लाख क्विंटल साखर उत्पादन, औरंगाबाद १४.१९ लाख मे. टन गाळप, १०.७३ लाख क्विंटल साखर उत्पादन, नांदेड २१.१२ लाख मे. टन गाळप, १७.९१ लाख क्विंटल साखर उत्पादन, अमरावती १.४४ लाख मे. टन गाळप, १.२९ लाख क्विंटल साखर उत्पादन, नागपूर ०.५९ लाख मे. टन ऊस गाळपातून ०.३७ लाख क्विंटल साखर उत्पादन.