राळेगणसिद्धी ग्रामस्थांचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 04:12 PM2019-01-31T16:12:36+5:302019-01-31T16:13:03+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून अण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धीतील ग्रामस्थ अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण संत यादवबाबा मंदिरामध्ये सुरू आहे.
राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून अण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धीतील ग्रामस्थ अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण संत यादवबाबा मंदिरामध्ये सुरू आहे.
मारूती हजारे म्हणाले, अण्णांचे उपोषण लवकर सुटावे, ही सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. अण्णांच्या मागण्या सरकारला मान्यच कराव्या लागतील. अण्णांचा स्वभाव हा पहिल्यापासूनच एक काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण केल्याशिवाय ते थांबत नाही. हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील, आणि लोकपाल, लोकायुक्त व शेतक-यांचे प्रश्न यावर मोदी सरकारला तत्काळ निर्णय घ्यावे लागतील.
अण्णांचे ज्येष्ठ सहकारी सावळेराम पठारे म्हणाले, अण्णा नेहमी देश व समाजाचाच विचार करतात. या मतलबी सरकारला अण्णांची काहीच काळजी नाही. सरकारने अधिक अंत न पाहता लवकरात लवकर अण्णांच्या मागण्या मंजूर कराव्यात, उपोषण सोडावे.
उपोषणाचा दुसरा दिवस
अण्णांचे उपोषण चालू होऊन जवळ पास २४ तासांपेक्षा अधिक वेळ झाला आहे. काल अण्णांचा रक्तदाब जास्त होता तो आज नियंत्रणात आला आहे. वजन अर्ध्या किलोपेक्षा कमी झाले असून शुगरही कमी झाली आहे. दुस-याच दिवशी अण्णांना थकवा आला आहे. अण्णांचे वय व वातावरण याचा विचार करता अण्णांनी अधिक बोलू नये तसेच जास्त वेळ विश्रांती घेणे सध्या योग्य राहिल असे डॉ. धनंजय पोटे यांनी सांगितले.
अण्णांच्या आंदोलनाला परिसरातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद वाढत असून आज दिवसभरामध्ये पारनेर, वडुले, पिंपळनेर, पानोली, जातेगाव, शिरूर तसेच तालुक्यातील आणि नगर जिल्ह्यातील अनेकांनी अण्णांना प्रत्यक्ष भेटून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणामध्येही सर्वजण सहभागी झाले होते.