कोपरगाव शहरासह दहा गावांत एक गाव एक गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:22 AM2021-09-11T04:22:17+5:302021-09-11T04:22:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : गेल्या वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट आहे. त्यानुसार मागील वर्षानुसारच प्रशासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : गेल्या वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट आहे. त्यानुसार मागील वर्षानुसारच प्रशासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना केलेल्या आवाहनानुसार कोपरगाव शहरासह तालुक्यातील दहा गावात एक गाव एक गणपती तर ६९ गावांत सार्वजनिक मंडळानी एकही गणपती न बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
कोपरगाव तालुक्यात एकूण ७९ गावे आहेत. त्यातील ३ गावे ही राहाता पोलीस ठाणे, ११ गावे ही शिर्डी पोलीस ठाणे, १० गावे हि कोपरगाव शहर पोलीस ठाणे तर सर्वाधिक ५५ गावे ही कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतात. यामध्ये कोपरगाव शहरात प्रशासनाच्यावतीने पोलीस, महसूल व नगरपरिषद प्रशासन यांच्या अधिपत्याखाली कोपरगाव शहर उत्सव समिती स्थापना करून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून संपूर्ण शहराचा म्हणून विघ्नेश्वर चौकात लाडक्या बाप्पाची विधिवत पूजा करून शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी स्थापना करण्यात आली.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या ५५ गावात पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी गेल्या महिनाभरापासून गावागावत सार्वजनिक मंडळांच्या बैठका घेऊन कोरोना काळात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मोर्वीस, वडगाव, धारणगाव, चांदेकसारे, उक्कडगाव, शहजापूर, सुरेगाव या सात गावात एक गाव एक गणपती बसविण्यात येणार आहे. तसेच राहाता पोलीस ठाण्यातर्गत येणारी ३ गावांपैकी काकडीत अशाच पद्धतीने गणपती बसविण्यात येणार आहे. तर शिर्डी पोलीस ठाण्यातर्गत येणाऱ्या ११ गावात गणपती बसविण्यासंदर्भात एकही अर्ज प्राप्त झालेला नव्हता. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १० गावांपैकी शिंगणापूर, डाऊच खुर्द, कोकमठाण या ३ गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली आहे.
.................
कोरोना काळात आलेल्या सार्जनिक गणेशोत्सवासंदर्भात मागील महिनाभर प्रत्येक गावात जाऊन गावातील सार्वजनिक मंडळाच्या बैठका घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी सविस्तरपणे चर्चा केली. त्यावर सर्वांनी सकरात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार सात गावांनी एक गाव एक गणपती अशी संकल्पना राबविली आहे. बसविण्यात आलेल्या गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी फक्त चार ते पाच जणांना परवानगी देण्यात आली आहे.
- दौलतराव जाधव, पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस ठाणे, कोपरगाव
..................
फोटो ओळी
कोपरगाव शहरातील विघ्नेश्वर चौकात प्रशासनाच्या कोपरगाव शहर उत्सव समितीच्या एक गाव एक गणपतीच्या संकल्पनेतील लाडक्या बाप्पाची शुक्रवारी विधिवत स्थापना करण्यात आली.
( छायाचित्र : संजय भवर )
--------
फोटो १०: एक गाव एक गणपती - कोपरगाव
100921\dsc00381.jpg
फोटो१०: एक गाव एक गणपती - कोपरगाव