देशाची एक पिढी पेंगुळतेय... दुसरी तरी वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:24 AM2021-08-22T04:24:08+5:302021-08-22T04:24:08+5:30

गेले दीड वर्ष शाळा बंद आहेत. या काळात मुलांच्या मस्तकात कितपत ज्ञानाची प्रक्रिया झाली, हा प्रश्न आहे. नव्याने त्यांना ...

One generation of the country is languishing ... save another | देशाची एक पिढी पेंगुळतेय... दुसरी तरी वाचवा

देशाची एक पिढी पेंगुळतेय... दुसरी तरी वाचवा

गेले दीड वर्ष शाळा बंद आहेत. या काळात मुलांच्या मस्तकात कितपत ज्ञानाची प्रक्रिया झाली, हा प्रश्न आहे. नव्याने त्यांना औपचारिक शिक्षणाच्या संदर्भाने गरजे इतके काही मिळाले नाही. मात्र त्या पलीकडे त्यांच्याकडे जे होते, तेही ते विसरत चालले आहेत, असे मत रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. जर तुम्ही दीड वर्ष शाळेच्या बाहेर असाल तर तुमचे तीन वर्षाचे नुकसान होते. त्यामुळे आता जी पिढी शिक्षणात सक्रिय आहे, ती पिढी माहिती आणि ज्ञानाच्या प्रक्रियेत निश्चित मागे पडणार आहे. मुलांचे शिक्षण सुरू असले तरी ज्ञानाची प्रक्रिया मात्र थंडावली आहे. गेले दीड वर्ष सरकारच्या वतीने ऑनलाइन शिक्षणाचा प्रयत्न केला गेला आहे. सुरुवातीला यू ट्यूब, नंतर दूरदर्शन वाहिनीच्या माध्यमातून शाळा बंद शिक्षण सुरू यासारख्या उपक्रमाबरोबर स्वाध्याय, गोष्ट शनिवारची, दीक्षा ॲपच्या माध्यमातून शिक्षणासाठीचे प्रयत्न झाले. त्या पाठोपाठ विविध ठिकाणी शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षणाचे प्रयोग सुरू केले. मात्र हे प्रयोग शंभर टक्के विद्यार्थ्यांचे शिक्षण करू शकले का? आणि अपेक्षित उद्दिष्ट्ये साध्य करण्यात यश मिळाले आहे का? त्याचे उत्तर नाही असेच आहे. मुळात कोरोनाचे संकट अचानक उभे ठाकल्याने यापूर्वी ऑनलाइन अध्यापनाचा विचार केलेला नव्हता. ऑनलाइन शिक्षणासंदर्भाने अध्यापनशास्त्र, त्यासाठी तंत्र, कौशल्य यासंदर्भाने फारशी जाणीव व माहिती व्यवस्थेतील मनुष्यबळाला नव्हती. तसे घडणे साहजिक होते. जगभरातदेखील कमी-अधिक प्रमाणात सारखीच परिस्थिती होती. वर्गात जसे अध्यापन करतो, त्या पद्धतीनेच ऑनलाइन अध्यापन केले तर त्याचा फारसा परिणाम होत नाही. खरेतर वर्गात शिकविल्यानंतर व समोरासमोर आंतरक्रिया होऊनही अपेक्षित सराव व पूरक मार्गदर्शनानंतरदेखील देशातील कोट्यवधी मुले किमान पायाभूत साक्षरतेवरती पोहचू शकलेले नाहीत. त्यात आता कोणतीही आंतरक्रिया नाही. केवळ ऑनलाइन होईल, त्या अध्यापनावरती विद्यार्थ्यांचे शिकणे परिणामकारक होण्याची शक्यता तरी गृहित कशी धरायची हा प्रश्न आहे.

भारतातील अझीम प्रेमजी फाउंडेशन यांनी केलेल्या एका सर्वेक्षण पाहणीतील आकडेवारी आणखी धक्कादायक आहे. त्यांनी कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड या राज्यातील ४४ जिल्ह्यातील १ हजार १३७ सरकारी शाळेतील इयत्ता दुसरी ते सहावीत शिकणाऱ्या १६ हजार ६७ विद्यार्थ्यांच्या भाषा आणि गणित विषयांच्या क्षमता तपासल्या. खरेतर हे संशोधन अंत्यत विश्वासार्ह आहे. कारण त्यांचे काम शिक्षणात गेले काही वर्ष सुरू आहे. त्यांनी केलेले सर्वेक्षण हे दोन स्तरावरील आहे. शाळा बंद होताना असलेली स्थिती आणि कोरोनानंतरची स्थिती असा तुलनात्मक अभ्यास केला आहे. त्यात त्यांनी चित्र वर्णन, शब्द वाचन, लेखन, अनुभव कथन यासारखी कौशल्य तोंडी आणि लिखित स्वरूपात तपासण्याचे काम केले. पहिल्या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांने ज्या क्षमता प्राप्त केल्या होत्या, त्यातील सुमारे ९२ टक्के विद्यार्थ्यांची किमान एका क्षमतेत घसरण झाली आहे. दुसरीतील ९२ टक्के, तिसरीतील ९८ टक्के, चौथीतील ९० टक्के, पाचवीतील ९५ टक्के, सहावीच्या ९३ टक्के मुलांच्या क्षमता कमी झालेल्या दिसून आल्या. दुसरी, तिसरीतील मुलांनी सोपी वाक्य वाचने, आकलनयुक्त वाचन, अचूक व गतीने वाचने या क्षमताही कमी झाल्या आहेत. चौथी ते सहावीच्या विद्यार्थ्यांचे तोंडी वर्णन करणे, वाचन सलगता यासारख्या क्षमताही कमी झाल्या आहेत. सलग लिहिणे, वाचने, आकलन या सर्व क्षमतांवरती निश्चित घसरण झाली आहे. दुसरी ते सहावीच्या ८२ टक्के विद्यार्थ्यांच्या गणन क्षमता कमी झाल्या आहेत. त्याच बरोबर गणितीक्रिया देखील गतिमान होऊ शकलेल्या नाहीत. खरेतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यासारख्या क्रिया प्राथमिक स्तरावरतीच पूर्ण होतात. येथेच ते कौशल्य गतिमान होते. आता लॉकडाऊनमध्ये पहिलीच्या वर्गात बाहेर पडलेला विद्यार्थी हा तिसरीत पोहचला आहे. पहिलीत दोन अंकी संख्या वाचन, स्थानिक किंमतीच्या संदर्भाने ओळख होते. आता तिसरीत चार अंकी ओळख व बेरीज, वजाबाकी, गुणाकार अपेक्षित आहे. आता विद्यार्थी हे सर्व शिकणे आणि सराव यात कमी पडणार आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या तार्किक क्षमता आणि गणितीय कौशल्य विकसनावर होणार यात शंका नाही. त्या अर्थाने भविष्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमता यास्तरावर प्राप्त न झाल्याने भविष्याचा पाया कच्चा राहण्याचा धोका आहे.

भविष्यात शाळा सुरू झाल्यातरी हे नुकसान भरून काढणे निश्चित कठीण असणार आहे. विद्यार्थ्यांना शिकविले गेले तरी त्यांना ते स्वीकारण्याच्या क्षमतेला निश्चित मर्यादा पडणार आहे. त्या अर्थाने हे नुकसान कसे भरून काढणार हा प्रश्न आहे. ही पिढी क्षमतेशिवाय पुढे जाणे राष्ट्रासाठीदेखील धोक्याचे आहे. त्या अर्थाने राजन यांचा इशारा समजून घ्यायला हवा. पदवी धारण केल्यानंतरही त्या क्षमता, कौशल्य प्राप्त झाले का याबद्दल सर्वांच्या मनात शंका आहे. मध्यंतरी एका बँकेच्या जाहिरातीत कोरोनाच्या काळात पदवी धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये असे नमूद केले होते. याचा अर्थ पदवीवरती शंका आहे. अर्थात हा विचार भविष्यात सर्वच अभ्यासक्रमातून पदवी धारण केलेल्या विद्यार्थ्यांच्यासंदर्भाने केला गेला तर नवल वाटायला नको. अपेक्षित उद्दिष्टांचे मोजमाप न करता परीक्षेच्या मांडवाखालून जात उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र धारण केले गेले तरी पदवीनंतर ते ज्या क्षेत्रात प्रवेशित होतील त्या क्षेत्राच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होताना पाहावयास मिळेल.

गरिबांच्या शिक्षणाबद्दलही राजन यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्या मुलांना सध्या ऑनलाइन शिक्षणाशी जोडण्यात अडचणी आहेत. आर्थिक विषमतेने शिक्षणात विषमता अधोरेखित झाली आहे. ही मुले सध्या रोजगाराशी जोडली गेली आहे. हातातील शिक्षणाची पाटी जाऊन डोक्यावर पाटी आली आहे. त्या पाटीने हाती पैसे येतील. त्याची गोडी वाढेल आणि शिक्षणाची अभिरूची कमी होईल. त्यामुळे अशा मुलांना पुन्हा शाळेत आणणे अत्यंत कठीण जाणार आहे. अनेक मुलींच्या मस्तकावरती अक्षदा पडल्या आहेत. बालविवाह प्रतिबंध असला तरी गळ्यात मंगळसूत्र पडले आहे, हेही वास्तव आहे. कोरोनापूर्वीच्या वर्षात सुमारे साडेसात लाख विद्यार्थी शिक्षणापासून तुटली आहेत. या काळात सर्वाधिक नुकसान याच व्यवस्थेचे झाले आहे. त्याचवेळी युनिसेफनेदेखील आपल्या अहवालात म्हटले आहे, की कोरोनात शाळा बंद झाल्यांने देशातील २५ कोटी मुलांवरती त्याचा परिणाम झाला आहे. हा परिणाम आणखी तीव्र होण्याचा धोका आहे. त्यामुळे किमान शाळा सुरू केल्या तर गरिबांचे शिक्षण सुरू होईल. त्यांच्या भविष्यातील अंधकार नष्ट करता येईल. त्यामुळे राजन यांचा इशारा समजून घेण्याची गरज आहे. अन्यथा अडखळत सुरू असणारा गुणवत्तेचा प्रवास आणखी अडखळण्याची शक्यता आहे.

-संदीप वाकचौरे

Web Title: One generation of the country is languishing ... save another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.