एकीकडे इंधनाची दरवाढ; दुसरीकडे वाढले खाद्यतेलाचे भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:08 AM2021-08-02T04:08:49+5:302021-08-02T04:08:49+5:30
संगमनेर : सर्व प्रकारच्या खाद्यतेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. एकीकडे इंधनाची दरवाढ तर दुसरीकडे वाढलेले खाद्यतेलाचे भाव यामुळे सर्वसामान्य ...
संगमनेर : सर्व प्रकारच्या खाद्यतेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. एकीकडे इंधनाची दरवाढ तर दुसरीकडे वाढलेले खाद्यतेलाचे भाव यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. कोरोना संकटामुळे विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्याचे नियोजन करत असताना सर्वसामान्यांना आता महागाईचा फटका बसतो आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पहिल्या लाटेत केलेला लॉकडाऊन आणि दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून घातलेले कडक निर्बंध यामुळे अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी व्यावसायिक, दुकानदार, नोकरदार, कामगार, शेतकरी अशा सर्वांचीच धडपड सुरू असताना पेट्रोल, डिझेलची झालेली दरवाढ आणि खाद्यतेलाचे वाढलेले भाव याची झळ सर्वसामान्य कुटुंबांना बसते आहे. पेट्रोल १०८ रुपये प्रति लीटर झाले आहे. खाद्यतेलाशिवाय स्वयंपाक होऊच शकत नाही. शंभर रुपयात एक लीटर पेट्रोल तसेच एक लीटर तेलही आता येत नाही. खाद्यतेलांचे भाव वाढल्याने गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागतो आहे.
----------------
तेलाचे प्रकार ऑगस्ट (२०२१) नोव्हेंबर (२०२०)
सोयाबीन तेल १५० १०५
पामतेल १४० ९०
सूर्यफूल तेल १७० १३०
शेंगदाणा तेल १८० १५०
(भाव रुपये प्रतिलीटरमध्ये)
--------------
दिवाळीच्या आधीपासून खाद्यतेलाचे वाढलेले भाव मध्यंतरी काही दिवस कमी झाले होते. आता पुन्हा भाव वाढले आहेत. परदेशातून फार मोठ्या प्रमाणात भारतात खाद्य तेलाची आवक होते. या वर्षी अमेरिका, ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. मलेशिया, इंडोनेशिया या पामतेल उत्पादक देशात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने त्याचाही परिणाम जाणवत असून खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत.
विशाल कर्पे, किराणा व्यावसायिक, संगमनेर
---------------------
गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरात आमचा केटरिंग व्यवसाय आहे. कोरोना संसर्गामुळे विवाह सोहळे सध्या मर्यादित लोकांच्या उपस्थितीत होतात. त्यामुळे केटरिंग व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांचे काम कमी झाले आहे. आम्हीदेखील मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतो आहे. त्यात खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमती आणि इंधनाची दरवाढ यामुळे व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे.
स्वाती नवनीत जोशी, केटरिंग व्यवसाय, गृहिणी, सोलापूर
------------------
खाद्यतेलाचे भाव खूपच वाढल्याने महिन्याचा किराणा आणताना चारशे ते पाचशे रुपये अधिक लागतात. खाद्यतेलाशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही. त्यामुळे कुठलाच पर्याय नसतो. काही महिन्यांपूर्वी १३० रुपये लीटर असलेले सूर्यफूल तेल आता १७० ते १७५ रुपये लीटर झाले आहे.
- क्रांती कुलदीपसिंग ठाकूर, गृहिणी, संगमनेर
----------------