हरिश्चंद्रगड अभयारण्यात शंभर फुटांचा वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 04:30 PM2020-01-12T16:30:32+5:302020-01-12T16:31:41+5:30

राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्यातील सर्वात उंच लोद नावाचा वृक्ष कोथळे गावालगत भैरवगडाच्या पायथ्याशी आहे. आजपर्यंत हा वृक्ष प्रसिद्धीस आला नाही. 

One hundred foot tree in Harischandragarh Sanctuary | हरिश्चंद्रगड अभयारण्यात शंभर फुटांचा वृक्ष

हरिश्चंद्रगड अभयारण्यात शंभर फुटांचा वृक्ष

मच्छिंद्र देशमुख। 
कोतूळ : अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई हे सर्वात उंच शिखर म्हणून प्रसिध्द आहे.  महाराष्ट्राचा प्राणी म्हणजे  ‘शेकरू’ सुद्धा अकोले तालुक्यातच आहे. राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्यातील सर्वात उंच लोद नावाचा वृक्ष कोथळे गावालगत भैरवगडाच्या पायथ्याशी आहे. आजपर्यंत हा वृक्ष प्रसिद्धीस आला नाही. 
अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखर हे राज्यातील सर्वात उंच शिखर गणले गेले आहे. तालुक्यातील दुसरी विशेष नोंद म्हणजे हरिश्चंद्रगड अभयारण्यातील  राज्यातील सर्वात उंच पानझडी वृक्ष लोद नावाचा वृक्ष. त्याची उंची ३०. ५० मीटर म्हणजे १०० फुटांपेक्षा जास्त आहे. गोलाई ९.१३ मीटर आहे. सरासरी विस्तार ११.५० मीटर असल्याची नोंद २००५ मध्ये एका लोखंडी फलकावर आहे. मात्र हे झाड तीन पिढ्यांपासून या जंगलातील सर्वात उंच झाड असल्याचे स्थानिक आदिवासी  सांगतात. इंग्रज सरकारने देखील याला महावृक्ष हे नाव दिले आहे. हा वृक्ष ज्या भैरवगडाच्या पायथ्याशी आहे. भैरवनाथाची देवराई असल्याने किमान एक हजार वर्ष इथे कुºहाड चालली नाही. या देवराईत आजही लोद, आंबा, करप, सादडा, उंबर, माड, हिरड असे पन्नास ते ऐंशी फूट उंचीचे शेकडो वृक्ष आहेत. या ठिकाणी किमान पन्नास शेकरांची घरटी उंच झाडावर आहेत. वानरे, माकडे, सापांचीही रेलचेल आहे.   वृक्षाजवळ १५ वर्षांपूर्वी उंची व आकाराबाबत वन विभागाने फलक लावलेला आहे. लोद या वृक्षाचे शास्रीय नाव फायकस नवरेसा असे आहे.


लोद या वृक्षाबाबत अलिकडेच माहिती मिळाली आहे. उंचीबाबत तुलनात्मक दृष्टीने अनेक संपर्क व शोध घेतले.  इतक्या उंचीचा वृक्ष आढळत नाही.  विशेष संशोधन व भैरवगड परिसर शेकरांमुळे  सायलेंट झोन असल्याने जबाबदारी वाढली आहे, असे हरिश्चंद्र गडाचे वनपरिक्षेत्राधिकारी अमोल आडे यांनी सांगितले. 


    लोदाची झाडे कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात आहेत. तो वड व उंबर यांच्या वंशातला आहे. हा वृक्ष म्हणजे आपल्या अभयारण्याची शान आहे, असे  हरिश्चंद्र गडाचे वनपरिक्षेत्राधिकारी डी. डी. पडवळ यांनी सांगितले.     

सातवाहन ट्रेकर्सने राज्यातील दीडशे किल्ले, गडवाटा व जंगले पाहिली आहेत. मात्र इतक्या उंचीचा व वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आढळला नाही. रेकॉर्ड आॅफ बुकमध्ये नोंद केल्यास पर्यटनाला नवा इतिहास मिळेल, असे सातवहन ट्रेकर्स ग्रुपचे अध्यक्ष धनंजय गाडेकर यांनी सांगितले.  
    

Web Title: One hundred foot tree in Harischandragarh Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.