टाकळी ढोकेश्वर येथील अपघातात एक ठार; अॅम्बुलन्समध्ये मृतदेह ठेवून ग्रामस्थांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:36 PM2017-12-07T12:36:01+5:302017-12-07T12:57:37+5:30
नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित टोलनाक्याजवळ तिखोल फाटा येथे बुधवारी रात्री मालट्रक व पिकअपची समोरासमोर धडक झाली. यात तिखोल येथील एका तरुणाचा मृत्यू झाला.
टाकळी ढोकेश्वर : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित टोलनाक्याजवळ तिखोल फाटा येथे बुधवारी रात्री मालट्रक व पिकअपची समोरासमोर धडक झाली. यात तिखोल येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी तिखोल ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी अपघातस्थळी मयत युवकाचा मृतदेह अॅम्बुलन्समध्ये ठेवून रास्त रोको आंदोलन केले.
अंकुश भागाजी ठाणगे (वय २८, रा. तिखोल, ता.पारनेर) असे मयताचे नाव आहे. बुधवारी रात्री अपघात झाल्यानंतर ठाणगे यास उपचारासाठी नगरला नेण्यात आले. दरम्यान येथे डॉक्टरांनी त्याची प्राणज्योत मालविल्याचे सांगितले. सकाळी मृतदेह तिखोल येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येत होता. मात्र, त्याचवेळी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा न नोंदविता दोन्ही वाहने अपघातस्थळावरुन हटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिखोल ग्रामस्थांनी संबंधित ट्रक चालकावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करीत अॅम्बुलन्समधून आणलेला मृतदेह तसाच गाडीत ठेवून रास्ता रोको आंदोलन सुरु केले. गुन्हा दाखल झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, असा इशारा आंदोलकांनी पोलिसांना दिला. सुमारे एक तास हे आंदोलन चालले. त्यामुळे वाहनांच्या सुमारे एक किलोमीटर रांगा लागल्या होत्या.
पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे व पोलीस कॉन्स्टेबल आबा ढोले हे घटनास्थळी दाखल झाले. गुन्हा नोंदवून त्याची प्रत मृताच्या नातेवाईकांच्या हातात लगेच दिली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
अपघातात पिकअपचा चक्काचूर
मालट्रक व पिकअपचा अपघात इतका भयावह होता की या अपघातात पिकअपचा चक्काचूर झाला. या अपघातातील मालट्रक (क्रमांक एम. एच. १४ बी़जे़ ११७६) नगरकडून कल्याणच्या दिशेने तर पिकअप (क्रमांक एम.एच.१६ ए वाय ३०९०) तिखोल गावाकडे चालली होती. तिखोल फाट्यावर असणा-या वळणावर हा समारोसमोर अपघात झाला. या महामार्गावर काम चालू असल्याने रस्ता अरूंद बनला आहे. त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.
मृत्यूच्या दाढेतून वाचले तिघे
चक्काचूर झालेल्या पिकअपमध्ये अंकुश ठाणगेसह तिखोल येथील इतर तीन तरूणही होते. परंतु या तिघांना अपघात स्थळापासून ५०० मीटर अंतरावर सोडून ठाणगे तिखोलकडे परतत असताना हा अपघात झाला. त्यामुळे या अपघातातून तिघेही बचावले असल्याची चर्चा आहे. तर अपघातातील मयत तरुणाला पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.
महामार्गाच्या कामाने घेतला बळी
नगर-कल्याण महामार्गाच्या रस्ता रुंदीकरण व प्रस्तावित टोलनाक्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महामार्गाच्या सथ कामानेच तिघोलच्या तरुणाचा बळी घेतला अशी चर्चा रास्ता रोको दरम्यान आंदोलकांमध्ये रंगली होती. या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.