एक लाख मराठ्यांना उद्योजक बनविणार -नरेंद्र पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:52 AM2020-01-25T11:52:41+5:302020-01-25T11:54:26+5:30
राज्यातील एक लाख मराठ्यांना उद्योजक बनविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नगर येथे केले.
अहमदनगर : मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना सोबत घेत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असून, राज्यातील एक लाख मराठ्यांना उद्योजक बनविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नगर येथे केले.
पुणे महामार्गावरील मंगल कार्यालयात आयोजित अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योजक व्हा, या कार्यक्रमात पाटील बोलत होते. आमदार संग्राम जगताप, माजी महापौर शीला शिंदे, उद्योजक चंद्रकांत गाडे, नगरसेवक गणेश भोसले, विनीत पाअुलबुधे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखील वारे, माजी सभापती सचिन जाधव आदींची प्रमुख उपस्थित होती. नरेंद्र पाटील पुढे म्हणाले, राजकीय जोडे बाजूला ठेवून अण्णासाहेब विकास महामंडळाची वाटचाल सुरू आहे. योजनेसाठी कुठल्याही राजकीय नेत्यांची शिफारस लागत नाही. कर्जाची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन आहे. महामंडळाच्या योजनांची माहिती आणि येणा-या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा व तालुकानिहाय दौरे सुरू करण्यात आले आहे. दौºयांची सुरुवात जालना जिल्ह्यातून करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्यावेळी अनेकांनी समन्वयक म्हणून सक्षमपणे जबाबदारी पार पडली. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची जिल्हानिहाय बैठका घेण्यात येतील. या बैठकांमध्ये योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाºया अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. शहरी भागात योजनांचा लाभ मिळेलच. परंतु, ग्रामीण भागातील युवकांना दिशा मिळत नाही. त्यांना दिशा देण्याचे काम महामंडळांच्या माध्यमातून केले जाणार असून, ही योजना शेतकºयांच्या बांधावर पोहोचविण्याचा मानस आहे, असे पाटील म्हणाले.
सरकार घरी आणून रोजगार देणार नाही. उद्योजक बनण्यासाठी स्वत:च प्रयत्न करावे लागतील. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
राज्यातील १० हजार समाज बांधव महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. आणखी ९० हजार उद्योजक बनविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम केलेल्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकार समाजाच्या मागे खंबीरपणे उभे आहे, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.