एक लाख रूपयांची अवैध दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 05:31 PM2018-05-24T17:31:00+5:302018-05-24T17:31:26+5:30
उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सुमारे एक लाख रूपये किमतीचा अवैध दारूसाठा पकडला. गुरूवारी सकाळी राहुरी येथे ही कारवाई करण्यात आली.
अहमदनगर : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सुमारे एक लाख रूपये किमतीचा अवैध दारूसाठा पकडला. गुरूवारी सकाळी राहुरी येथे ही कारवाई करण्यात आली. उत्पादन शुक्ल विभागाचे अधीक्षक अभय नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक धनंजय लगड, कॉन्स्टेबल प्रविण साळवे, बी. एम. चत्तर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
राहुरी येथे एका वाहनातून अवैध दारू नेली जाणार असल्याची खबर उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि. २४) सकाळी पथकाने राहुरी येथे सापळा लावला. काही वेळातच अवैध दारू घेऊन जाणारी टाटा इंडिका कार (एमएच १७ व्ही १३५०) येताना पोलिसांना दिसली. कारला थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. परंतु चालक कार न थांबवता निघून गेला. त्यामुळे पथकाने या वाहनाचा पाठलाग करून कार पकडली. कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव दत्ता नवनाथ पाटील असे सांगितले. त्याच्या कारची पोलिसांनी झडती घेतली असता, काही बिअर बॉक्स व देशी दारू मिळून सुमारे १ लाख ४ हजार ९९२ रूपयांचा ऐवज मिळून आला. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन दारू जप्त केली.