एका फोन कॉलनं ‘ती’ची झाली बंधनातून मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 07:05 PM2019-06-02T19:05:00+5:302019-06-02T19:05:02+5:30
‘एका तरुण मुलीला तिचा नवरा आमच्या येथे सोडून गेलाय.
अहमदनगर : ‘एका तरुण मुलीला तिचा नवरा आमच्या येथे सोडून गेलाय. तिची नजर एकाच ठिकाणी खिळलेली आहे. आठ दिवसांपासून तिने अन्नाचा कण अन पाण्याचा थेंबही गिळलेला नाही. तब्येतही खालावली आहे. डॉ. तुम्हीच आधार देऊ शकता,’ असा आवाज मोबाईलवर पलीकडील व्यक्तीचा आला. डॉ. राजेंद्र धामणे आणि डॉ. सुचेता धामणे यांनी ताबडतोब धाव घेत तरुणीला देहरे येथील माऊली संस्थेत दाखल करत सर्व बंधनातून मुक्तता केली.
चार-पाच दिवसांपुर्वी घडलेली ही घटना. दररोजच्या कामासाठी डॉ.राजेंद्र धामणे निघाले होते. इतक्यात त्यांचा मोबाईल नेहमीप्रमाणे खणाणला. पलीकडून कोणीतरी अनोळखी व्यक्ती बोलत होती. मोबाईलवर बोलणारी व्यक्ती अहमदनगर शहराजवळ राहणारी होती. ‘आमच्या येथे एका तरुण मुलीला आठ दिवसांपुर्वी सोडले आहे. तिने तेव्हापासून काहीच खाल्ले अन पिलेही नाही, त्यामुळे तुम्ही तिला घेऊन जा, अशी विनंती याने डॉ. धामणे यांना केली. नगरजवळच हे स्थळ आहे. अनेक ठिकाणांहून लोक येथे येतात. मानसिक आजार झालेला व्यक्ती येथे ठेवल्यानंतर बरे होतात, अशी लोकांची गैरसमजूत आहे. देवाची अवकृपा, भूत बाधा, करणी किंवा जादूटोणा केला असे अनेकजण समजतात. यातूनच मानसिक आजार झालेल्या व्यक्तींना आणून बांधतात.
अशाच एका तीव्र मानसिक आजारी तरुणीला तिचा नवरा येथे घेवून आला. सोबत एक लहान बाळही होते. तिची अवस्था खूपच भयाण होती. तिला स्वत:चे भान नव्हते. नजर सरळ अन एकटक असायची. आजूबाजूच्या कुठल्याच गोष्टीची जाणीव नाही. तिच्या नव-याने तिच्या पायात साखळदंड अडकवून कुलूप लावले. मुलाला औषध घेवून येतो म्हणून गायब झाला. आठ दिवस महिला आहे त्याच अवस्थेत होती. तब्बल आठ दिवस काहीच न खाल्ल्यानं अशक्त झाली होती. एका फोन कॉलमुळे डॉ. धामणे यांनी या महिलेला आधार देत सर्व बंधनातून तिची मुक्तता केली.
माऊली कुटुंबात २०० सदस्य
नगर तालुक्यात देहरे येथे डॉ.धामणे दाम्पत्यांनी मनोरुग्ण महिलांना आधार देण्यासाठी माऊली सेवा प्रतिष्ठान सुुरु केले आहे. बेवारस असणा-या महिलांना येथे आधार दिला जातो. नगर-मनमाड हायवेलगत असणा-या या संस्थेत आतापर्यत तब्बल २०० महिला सदस्य आहेत.
‘समाजात आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रध्दा आहेत. एखाद्या ठिकाणी ठेवल्यानंतर मानसिक आजार बरा होतो, ही पण एक अंधश्रध्दा आहे. अशा परिस्थतीत घरच्यांनीच आधार देणे गरजेचे आहे. दवाखान्यात उपचार घ्यावेत. उपचार घेतल्यानंतर हा आजार बरा होतो.’ असे माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ.राजेंद्र धामणे यांनी सांगितले.